Rashid Khan Hospitalized: प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांना शनिवारी (२३ डिसेंबर) कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयाच्या ५५व्या वर्षी ते कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. रामपूर-सहस्वान घराण्याचे प्रसिद्ध गायक राशिद खान मागील बऱ्याच काळापासून प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत. या दरम्यान, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नंतर त्यांनी कोलकात्यातच उपचार सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
मीडिया रिपोर्टनुसार, राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, सेरेब्रल अटॅकनंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. यानंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टर सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. राशिद खान हे रामपूर-सहस्वान घराण्यातील खान हे घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे पणतू आहेत.
संगीत विश्वात राशिद खान यांचे मोठे नाव आहे. राशिद खान यांचा दिनक्रम पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. त्यांनी वयाच्या अवघ्या ११ वर्षी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते रामपूर-सहस्वान घराण्याशी संबंधित आहे. या घराण्याची सुरुवात मेहबूब खान आणि त्यांचा मुलगा इनायत हुसेन खान यांच्यापासून झाली होती. राशिद खान हे प्रामुख्याने शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध असले तरी, त्यांच्या फ्यूजन आणि चित्रपट गाण्यांना देखील भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी 'माय नेम इज खान', 'राझ ३, 'बापी बारी जा', 'कादंबरी', 'शादी में जरूर आना', 'मंटो' आणि 'मीटीन मास' यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली आहेत.