बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक आणि रॅपर म्हणून बादशाह ओळखला जातो. सध्या बादशाह अडचणीत सापडला आहे. त्याला फेअरप्ले नावाच्या अॅपसाठी केलेल्या जाहिरातीमुळे महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले आहे. फेअरप्ले हे अॅप कोणतीही परवानगी न घेता आयपीएल दाखवत असल्याचा आरोप वाय कॉम या कंपनीने केला आहे. वाय कॉमच्या तक्रारीनंतर सायबर सेलने फेअरप्लेवर डिजिटलवर कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला.
बादशाहने फेअरप्ले या अॅपसाठी एक जाहिरात केली आहे. त्यामुळे सायबर सेलने बादशाहला चौकशीसाठी बोलावले आहे. बादशाह सोबत बॉलिवूडमधील आणखी ४० कलकारांना सायबर सेलने समन्स बजावले आहे. अभिनेता संजय दत्तचा देखील यामध्ये समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: 'तेजस'कडे प्रेक्षकांची पाठ; कंगना रणौतने व्हिडीओतून प्रेक्षकांना केलं आवाहन
फेअरप्ले हे देखील महादेव अॅपप्रमाणे बेटिंग अॅप आहे. या अॅपवर कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय आयपीएल मॅच लाइव्ह दाखवण्यात आली आहे. ही गोष्ट जेव्हा वाय कॉम कंपनीच्या लक्षात आली तेव्हा सायबर सेलने अॅप आणि अॅपशी संबंधीत असणाऱ्या सर्वांना समन्स बजावले आहेत.
यापूर्वी बादशाहला ७ जानेवारी पर्यंत नागपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बादशाह विरोधात फेअरप्ले या अॅपसाठी अश्लिल गाणे गायल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.