Ranveer Singh Saves Girl From Mob: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण स्टारर 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.या ट्रेलरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. प्रेक्षक गेल्या काही काळापासून या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रणवीर सिंह देखील सहभागी झाला होता. यादरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात अभिनेत्याचं एका असं रूप पाहायला मिळालं आहे, ज्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. आता अभिनेत्याचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.
ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान जेव्हा रणवीर सिंह त्याच्या चाहत्यांना भेटायला आला, तेव्हा त्याने पाहिले की एक छोटी मुलगी गर्दीत अडकली होती आणि खूप रडत होती. रणवीरचं लक्ष जाताच क्षणाचाही विलंब न करता रणवीरने लगेच तिला मदत केली. त्याने गर्दीत शिरून त्या लहान मुलीला थेट उचलून घेतलं आणि सुरक्षितपणे तिच्या आईकडे सुपूर्द केलं. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून, लोक रणवीरच्या या वागण्याचे खूप कौतुक करत आहेत. त्याच्या या कृतीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
रणवीर सिंहच्या या मन जिंकून घेणाऱ्या कृतीवर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'सिंबा आता सुपरमॅन झाला आहे'.तर, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'हा बाप बनण्याचा परिणाम आहे.' या घटनेनंतर अनेकांनी रणवीरचे कौतुक करत तो चांगला पिता असल्याचे म्हटले आहे. आणखी एका युजरने लिहिले की, 'म्हणूनच देवाने त्याला मुलगी दिली आहे, तो तिचा सांभाळ करण्यासाठी पात्र आहे.'
रणवीर सिंहचा 'सिंघम अगेन' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, जो दिवाळीत रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाची कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'शी टक्कर होणार आहे. यापूर्वी रणवीर सिंह'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसोबत दिसला होता. 'सिंघम अगेन' व्यतिरिक्त त्याच्याकडे 'डॉन ३' सारखा मोठा चित्रपट देखील आहे.
संबंधित बातम्या