Ranveer Allahbadia : युट्युबर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात मुंबई आणि आसाममध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लोकांनी केवळ रणवीरविरोधातच नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट 'मधील इतरांविरोधातही तक्रारी दाखल केल्या आहेत. खरं तर ''इंडियाज गॉट लॅटेंट' या मालिकेच्या ताज्या एपिसोडमध्ये रणवीरने अपशब्द वापरत आई-वडिलांच्या वैयक्तिक संबंधांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, यूट्यूबर आणि इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलनी, जसप्रीत सिंग, अपूर्व मखीजा आणि इतरांची नावे अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल एफआयआरमध्ये आहेत.
मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते निखिल रुपारेल यांनी वकील अली काशिफ खान देशमुख यांच्या मदतीने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, कॉमेडियन समय रैना, यूट्यूबर आशिष चंचलानी आणि ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रणवीर अलाहाबादिया यांच्या वक्तव्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून युट्युबला पत्र लिहिले आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे भाजप उपाध्यक्ष नीलोत्पल मृणाल यांनी खार पोलिस स्टेशनला कारवाईसाठी तक्रार पत्र पाठवले आहे.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अयोग्य किंवा अश्लील मजकूर प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
अलाहबादियानं केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपुष्टात येतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. समाज म्हणून आपल्याकडं काही नियम आहेत, त्यांचं कोणी उल्लंघन करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या