Ranveer Allahbadia apology News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्यावर अत्यंत घाणेरडा आणि अश्लील जोक्स केल्यामुळं अडचणीत आलेला युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया ताळ्यावर आला आहे. त्यानं आपल्या अभद्र टिप्पणीबद्दल जाहीर माफी मागितली आहे.
अलाहबदियानं शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाला भयंकर प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला. मात्र शो होस्ट करणारा समय रैना आणि त्याच्या सोबतचे लोक फिदीफिदी हसत होते. मुंबईतील दोन वकिलांनी अलाहबादिया याच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घडामोडीनंतर अलाहबादिया यानं 'एक्स'वर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.
‘त्या शोमध्ये मी जे काही बोललो, ते बोलायला नको होतं. मला माफ करा,’ असं त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
'माझं वक्तव्य केवळ अयोग्यच होतं असं नाही तर कुठल्याही दृष्टीनं गंमतीशीर नव्हतं. कॉमेडी हा माझा प्रांत नाही. मी इथं फक्त सॉरी म्हणायला आलो आहे. जे काही घडलं त्यासाठी मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी इथं फक्त माफी मागायला आलो आहे. माझ्या वैयक्तिकरित्या निर्णयात चूक झाली होती. माझ्याकडून जे घडलं ते चांगलं नव्हतं. हा पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात. ही जबाबदारी मी टाळू शकत नाही. कुटुंब या व्यवस्थेचा मी कधीच अनादर करू शकणार नाही. मला टीआय प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण अनुभवातून मी हेच शिकलो आहे, असं अलाहबादियानं म्हटलं आहे.
‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या एपिसोडमधून मी तो असंवेदनशील भाग वगळायला सांगितला आहे. शेवटी मी एवढंच सांगू शकतो, मला आशा आहे की तुम्ही एक माणूस म्हणून मला माफ कराल, असंही त्यानं म्हटलं आहे.
या कॉमेडी शोमध्ये होस्ट समय रैना यांच्यासोबत अलाहबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्व मुखीजा उर्फ द रिबेल किड हे जज म्हणून सहभागी झाले होते. शोमध्ये परीक्षक सहसा स्पर्धकांना त्यांच्या कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी उलटसुलट प्रश्न विचारतात. मात्र, अलाहबदियानं त्यासाठी एक चुकीचा आणि विचित्र प्रश्न निवडला.
‘तुम्ही तुमच्या आई-वडिलांना रोज सेक्स करताना पाहाल की ते कायमचं थांबवण्यासाठी त्यांच्यात सहभागी व्हाल?’, असा प्रश्न रणवीरनं विचारला होता.
संबंधित बातम्या