Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक आता एका वेगळ्या वळणावर आलं आहे. या मालिकेची आता तब्बल १४ वर्ष पुढे ढकलण्यात आली असून, मालिकेतील या लीपनंतर कथेत देखील अनेक बदल घडले आहेत. कार्तिक स्वतः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता तुरुंगातून बाहेर आला आहे. तर, आपल्या वडिलांना आई दीपाच्या चुकीमुळेच तुरुंगात जावं लागलं, अशी समजूत झाल्यामुळे त्यांची मुलगी कार्तिकी ही दीपाचा प्रचंड तिरस्कार करते.
कार्तिक तुरुंगात गेल्याच्या क्षणापासून कार्तिकी दीपाचा तिरस्कार करत आहे. तर, दीपिकाने मात्र नेहमीच आपल्या आईला खंबीर साथ दिली. या १४ वर्षांच्या काळात कार्तिकीला काही पत्र मिळाली, जी कार्तिकने लिहिली आहेत, असा तिचा समज आहे. या पत्रांमधून कार्तिकने कार्तिकीला दीपाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून तिच्या मनातील रागाला आणि तिरस्काराच्या भावनेला आणखी खतपाणी दिलं. या पत्रांमुळेच कार्तिकीच्या मनातील द्वेष आणखी वाढला.
आता दीपा-कार्तिक आणि दीपिका-कार्तिकी यांच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे. कार्तिकीचा मित्र आर्यन याची आता मालिकेत एन्ट्री झाली आहे. मात्र, आर्यनच्या येण्याने इनामदार कुटुंबातील वाद आता आणखी वाढत चालले आहेत. नुकत्याच एका भागात आर्यन कार्तिकीला भेटण्यासाठी लपून-छपून इनामदारांच्या बंगल्यात आला होता. या आधी त्याने केलेला फोन दीपाने उचलल्यामुळे इनामदारांच्या घरात मोठा राडा झाला. यावेळी दीपाने कार्तिकीच्या कानशिलात देखील लगावली.
या वादादरम्यान कार्तिकने दीपा आणि कार्तिकीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्तिकचं बोलणं पटल्याने दीपा देखील लेकीची माफी मागण्यास तयार झाली. दीपा कार्तिकीकडे गेली असता, आर्यनला भेटायला निघालेली कार्तिकी १४ वर्षात पहिल्यांदाच दीपाशी बोलते. मी तुला माफ केलं, असं कार्तिकी तिला टाळण्यासाठी म्हणते. मात्र, १४ वर्षात आपली मुलगी पहिल्यांदाच आपल्याशी बोलली आणि तिने आपल्यला माफ केलं यामुळे दीपा आनंदी होते. मात्र, कार्तिकीच्या मनात दीपाबद्दलचा हा तिरस्कार अजूनही कायम आहे. मालिकेच्या येत्या भागात आणखी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या