Rang Maza Vegla Latest Update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये सध्या १४ वर्षांचा लीप दाखवण्यात आला असून, आता या मालिकेचं कथानक तब्बल १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. आता या मालिकेत काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील झाली आहे. दीपिका आणि कार्तिकी आता २० वर्षांच्या झाल्या असून, त्यांची जागा आता दोन नव्या कलाकारांनी घेतली आहे. तर, आता मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या नवोदित अभिनेत्याचे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘जयदीप’शी खास नातं आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं बदललेलं कथानक हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात हात नसताना देखील कार्तिकला या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली आहे. आता १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. कार्तिक घरी आल्यानंतर वातावरण आता सगळंच चित्र बदललेलं दिसत आहे. एकीकडे दीपिका वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर झाली आहे. तर, कार्तिकी मात्र, प्रवाहाच्या विरोधात जाऊन सगळ्या गोष्टी करताना दिसत आहे.
आता या मालिकेत धाकड कार्तिकीच्या नव्या मित्राची एन्ट्री होणार आहे. इनामदारांच्या आयुष्यात आता कार्तिकीच्या मित्राची म्हणजेच ‘आर्यन’ची एन्ट्री होणार आहे. आर्यनच्या भूमिकेत अभिनेता मेघन जाधवची एन्ट्री होणार आहे. मेघन या मालिकेत एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. मेघन जाधव हा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘जयदीप’ म्हणजेच अभिनेता मंदार जाधव याचा भाऊ आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मेघन देखील अभिनय क्षेत्रात आला आहे.
आता मेघनच्या एन्ट्रीमुळे इनामदारांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. आता कार्तिकीसोबत दीपाला त्रास देण्याच्या कामात आर्यनही सहभागी होणार का? की आर्यन कार्तिकीला तिच्या आईच्या आणखी जवळ आणणार हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.