संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडली. एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये सोमवारी मारला गेला. या घटनेमुळे काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बदलापूर येथे एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने हा अत्याचार केल्याचे समोर आले. शाळेतील मुलींच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी बदलापूर येथे मोठे आंदोलन झाले होते. यानंतर या प्रकरणी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. अक्षय शिंदेला सोमवारी संध्याकाळी ६च्या सुमारास तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ठाण्याला घेऊन चालले होते.
दरम्यान, अक्षय शिंदेने शेजारी बसलेल्या पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. अक्षयने जवळपास ३ गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी निलेश यांच्या पायाला लागली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांवी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्यांमुळे अक्षय गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अक्षयला मृत असल्याचे घोषीत केले. या प्रकरणावर अभिनेत्री विदिशा म्हसकरने पोस्ट शेअर केली आहे.
विदिशा म्हसकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'शाळेतील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र पोलिसांकडून मारला गेला. नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले' असे लिहिण्यात आले आहे. सोबतच महाराष्ट्र पोलिसांची वर्दी आणि त्यावर वर्तुळात एकनाथ शिंदे यांचा फोटो लावलेला आहे. ही पोस्ट शेअर करत विदिशाने 'खऱ्या आयुष्यातील सिंबा, सिंघम स्टोरी' असे म्हटले आहे. विदिशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
विदिशा म्हसकर ही सध्या छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिसत आहे. त्यानंतर तिने 'हे मन बावरे' या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच तिच्या '३६ गूण जोडी', 'भाग्य दिले तू मला' आणि इतर काही मालिका हिट ठरल्या होत्या.