Swatantrya Veer Savarkar Review In Marathi: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा याचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आज (२२ मार्च) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह होता. मात्र, आता थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी प्रेक्षकांचा हाच उत्साह मावळलेला दिसला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. रणदीप हुड्डा दिग्दर्शित हा चित्रपट केवळ इतिहासाचे धडे दाखवणारा आहे, ज्यामुळे तो कंटाळवाणा झाल्यासारखे वाटते. चला तर जाणून घेऊया एकंदरीत कसा आहे हा चित्रपट...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या या चित्रपटाची कथा विनायक दामोदर सावरकर यांच्या बालपणापासून सुरू होते. लहानपणीच मातृछत्र हरपलेल्या विनायक दामोदर सावरकर यांना तरुणपणात आपल्या वडिलांना देखील गमवावे लागते. एका महामारीमुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांचे वडील आपल्या मुलाला ‘क्रांतिकारक बनवू नकोस. इंग्रज फार मोठे आहेत, आपण त्यांच्याशी लढू शकत नाही. तेव्हा तू यातून बाहेर पड’, असे समजावून सांगत असतात. मात्र, विनायक दामोदर सावरकर यांनी आपण क्रांतिकारक व्हायचंच हे मनाशी ठरवलेलं असतं. ब्रिटिशांना थांगपत्ताही लागू न देता सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अभिनव भारत सोसायटीची सुरुवात केली होती. आपल्या भावाला त्याच्या प्रत्येक क्रांतीकारी पावलावर साथ देण्यासाठी थोरले बंधू गणेश सावरकर देखील खंबीरपणे उभे राहिले. आपल्या भावाला लंडनमध्ये जाऊन शिकता यावे, यासाठी गणेश सावरकर यांनी असे सासर निवडले, जे यासाठी आर्थिक मदत करू शकतील. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण आयुष्याचा आढावा घेण्यात आला आहे. परदेशात शिक्षण, मग तुरुंग ते काळ्यापाण्याची शिक्षा, शेवटी अनेक वर्षांनंतर विनायक दामोदर सावरकरांची घरवापसी या सगळ्या घटना चित्रपटात पाहायला मिळत आहेत. मात्र, या दरम्यान नेमकं काय काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे यातील कलाकारांचा अभिनय. नेहमीप्रमाणेच यावेळीही रणदीप हुड्डाने आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटातील पात्राच्या गरजेनुसार त्याने स्वत:ला त्यात चपखल बसण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्याची मेहनत स्पष्टपणे दिसत आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेने रणदीप हुड्डा याच्या पत्नी अर्थात वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. मात्र, तिला पडद्यावर फारच कमी जागा मिळाली आहे. अभिनेता अमित सियालनेही उत्कृष्ट काम केले आहे. राजेश खेरा यांनी महात्मा गांधींच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. तर, सचिन पिळगांवकर नेताजींच्या भूमिकेत शोभून दिसले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून अभिनेता रणदीप हुड्डा याने दिग्दर्शनाच्या नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका देखील केली आहे. या चित्रपटात त्याने उत्तम अभिनय केला, पण दिग्दर्शनात तो अपयशी ठरल्यासारखे वाटत आहे. या चित्रपटात अशी काही दृश्येही दाखवण्यात आली आहेत, जी केवळ सावरकरांबद्दल सखोल माहिती असलेल्यांनाच समजू शकतील. चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण करतात आणि अनेकांच्या मनात ते प्रश्न तसेच घोळत राहतात. इतकंच नाही तर, चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास बराच ताणाला गेला आहे. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो.
चित्रपट: स्वातंत्र्यवीर सावरकर
दिग्दर्शक: रणदीप हुद्दा
कलाकार: रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल