Swatantrya Veer Savarkar Trailer Out: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखडे त्यांच्या आगामी 'स्वातंत्र्य वीर सावरकर: अ सिनेमॅटिक ट्रिब्यूट टू इंडियाज अनसंग हिरो' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. आता या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा पाहायला मिळत आहे.
'भारताला स्वातंत्र्य अहिंसेनेच मिळाले हे आपण सर्वांनीच वाचले आहे. पण ही त्याची कथा नाही’, रणदीप हुड्डाच्या आवाजात याच डायलॉगने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. सावरकरांनी अखंड भारतासाठी कसा संघर्ष केला, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले सैन्य कसे उभे केले आणि इंग्रजांना भारतातून हाकलण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले, हे या कथेतून दाखवण्यात येणार आहे. आपल्या क्रांतिकारी वर्तनामुळे सावरकरांना इंग्रजांचाही जुलूम सहन करावा लागला. त्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तरीही सावरकरांनी हार मानली नाही आणि आपला लढा सुरूच ठेवला.
२२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट वीर सावरकरांवर आधारित असणार आहे. विनायक दामोदर सावरकर यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण आजही त्यांच्याबद्दल लोकांना फार कमीच माहिती आहे. सावरकरांबद्दल बोलताना नेहमीच असं म्हटलं जातं की, ते जहालमतवादी असल्यामुळे त्यांच्या वागण्यामुळे त्यांचे महात्मा गांधींसोबत कधीच जमले नाही. या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची न पाहिलेली बाजू बघायला मिळणार आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखडे यांच्यासोबत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात अभिनेता अमित सियाल देखील दिसणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेता रणदीप हुड्डा यांने वीर सावरकरांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. ट्रेलर पाहून असेच वाटते की, त्याने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे. रणदीप प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक दाखवतो. या चित्रपटात अंकिता लोखंडेचीही महत्त्वाची भूमिका आहे. ती सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.