बॉलिवूड अभिनेते, निर्माते राज कपूर यांची १००वी जयंती १४ डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी फिल्म फेस्टीवलचे आयोजन केले आहे. यामध्ये राज कपूर यांचे १० सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. या फेस्टिवलचे आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले होते. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरने मोदींना भेटण्याचा अनुभव सांगितला आहे.
कपूर कुटुंबाने एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट कशी होती. रणबीर कपूरने कबूल केले की, पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी तो आणि कुटुंबातील सर्व सदस्य नर्व्हस झाले होते. तसेच मोदींनी एक-दोन विनोद करुन सर्वांना कम्फर्टेबल केले.
पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर रणबीर कपूर म्हणाला, आजचा दिवस आमच्या कपूर कुटुंबासाठी खूप खास आहे. मोदीजी राज कपूर यांचा खूप आदर करतात. त्यांनी आम्हाला आपला मौल्यवान वेळ दिला त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा खूप मजा आली कारण आम्ही त्यांना बरेच वैयक्तिक प्रश्न देखील विचारले. ते आमच्याशी अतिशय मैत्रीपूर्ण स्वभावाने बोलत होते. त्यामुळे सुरुवातीला आमची हवा टाइट झाली होती पण नंतर हसत खेळत बोलू लागलो. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांनी आम्हाला वेळ दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
या व्हिडीओमध्ये पुढे आलियाने देखील मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आलिया भट्टने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. "त्यांची ऊर्जा, त्यांचा दयाळूपणा आणि त्यांनी ज्या प्रकारे आमचे स्वागत केले खरच चकीत करणारे होते. त्यांनी राज कपूर यांच्याविषयी देखील वक्तव्य केले. आपला वारसा पुढे नेण्यासाठी आणि जगाला शिक्षित करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो, याविषयीही त्यांनी खूप चांगल्या कल्पना दिल्या. त्यामुळे खूप बरं वाटलं. एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. "
वाचा: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
करिश्मा कपूरने मोदींचे आभार मानले आहेत. 'माझे आजोबा राज कपूर यांनी आमच्या कुटुंबालाही खूप आदर आणि खूप प्रेम दिले. मी स्वत:ला खूप प्रभावित मानते. हा आपच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास दिवस आहे. त्यामुळे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आणि दादाजींना दिलेल्या आदराबद्दल मोदीजींचे खूप खूप आभार' असे म्हटले आहे. रिद्धिमा कपूर साहनी म्हणाली की, "आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि ते जणू आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे अशा प्रकारे आम्हाला भेटण्याचा आनंद दाखवत होते. मी सांगू इच्छितो की, आज नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर माझे जीवन यशस्वी झाले आहे."