दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत होता. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. चित्रपटाने जवळपास १०० कोटी रुपयांचा पल्ला पार केला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे प्रदर्शित होणार...
मिळालेल्या माहितीनुसार अॅनिमल जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. साधारण कोणताही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ४५-६० दिवसांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. त्यानुसार जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
वाचा: मी ळोळावणामध्ये ळोळतो; 'चतूर'चे भन्नाट मराठी ऐकून हसू होईल अनावर
'अॅनिमल' हा सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'अॅनिमल'ने ६३.८ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी, तिसऱ्या दिवशी ७१.४६ कोटी, चौथ्या दिवशी ४३.९६ कोटी, पाचव्या दिवशी ३७.४७ कोटी, सहाव्या दिवशी ३०.३९ कोटी, सातव्या दिवशी २४.२३ कोटी, आठव्या दिवशी २२.९५ कोटी आणि नवव्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने ३९८.५३ कोटींची कमाई केली. तर जगभरात या सिनेमाने ६०० कोटींचा गल्ला जमवला.