Ram Gopal Varma Arrest: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, हैदराबाद पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम गोपाल वर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर काही मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे काही राजकीय नेत्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्यावर ओंगोले ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मंत्री लोकेश, आणि डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्या बदनामीच्या पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केल्याचा आरोप आहे. टीडीपीचे सरचिटणीस मुथनापल्ली रामलिंगम यांनी वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी वर्मा यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते अद्यापही हजर झाले नसल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
राम गोपाल वर्मा यांना याआधी १९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती, परंतु ते हजर झाले नाहीत. यानंतर दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली, तरीही त्यांनी कोर्टात जाणे टाळले. यामुळे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी तयारी केली आहे. पोलिस पथकाने आज त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, मात्र वर्मा तिथेही अनुपस्थित असल्याचे आढळले.
राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे आधीच वादात आलेल्या या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक चर्चा रंगल्या आहेत. आता राम गोपाल वर्मा यांना जर अटक झाली, तर त्याचा त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो.
राम गोपाल वर्मा यांनी अद्यापही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या वकिलांमार्फत कायदेशीर लढाईसाठी तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतल्याने वर्मा यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहावे लागेल, अन्यथा त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटसृष्टीतील या घटनेने प्रेक्षकांमध्येही मोठी चर्चा निर्माण केली आहे.