Rakul Preet Singh Wedding Photos: गेल्या वर्षीपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे सुरु आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रकुल आणि जॅकी काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा डिनरडेटला जाताना, फिरायला जाताना दिसले होते. आता त्यांनी त्यांचे नाते अधिकृत करण्याचे ठरवले आहे. दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.
वाचा: 'या' मराठमोळ्या स्टारकिडचे मोठ्या पडद्यावर पदार्पण; आईसोबतच साकारणार पहिली भूमिका!
फोटोमध्ये रकुलने फिकट गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच पांढऱ्या डायमंडची ज्वेलरी घातली आहे. वधूच्या या लूकमध्ये रकुल अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तर दुसरीकडे जॅकीने क्रिम रंगाची शेरवानी घातली आहे. त्यावर सुंदर अशी डायमंडची माळ घातली आहे. या लूकमध्ये जॅकी अतिशय हँडसम दिसत आहे. दोघांचाही लग्नातील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर जॅकी आणि रकुलच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स वर्षाव केला आहे. तसेच काही कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रकुल आणि जॅकीचा लग्नसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गोव्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सिंधी आणि पंजाबी या दोन्ही रितीरीवाजाने त्यांच्या विवाहसोहळा संपन्न झाला.
रकुल आणि जॅकीने काही मोजक्याच कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाला लग्नाला बोलावले होते. बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे, वरुण धवन, शाहिद कपूर, मीरा कपूर, आदित्य रॉय कपूर, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टीने लग्नात डान्स केल्याचे म्हटले जाते.