Raksha Bandhan Marathi Celebrity: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहीणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. हा सण केवळ भावा बहिणींचा नव्हे, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या निमित्ताने ‘झी मराठी’च्या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'पारू' मालिकेतील शरयू सोनावणे म्हणते, ‘माझ्या भावाचं नाव आहे सिद्धांत सोनवणे आणि आम्ही जुळी भावंडं आहोत. आमच्यात ८ मिनिटांचा फरक आहे आणि त्यात तो मोठा आहे. मला घरात सर्व शेंड फळ म्हणतात. आमचं नातं असं आहे की, मी आजारी पडली की तो ही आजारी पडायचा. मला दुखापत झाली की, त्यालाही त्रास व्हायचा आम्ही एकत्र ही राहात नव्हतो. १ वर्षाचा असल्यापासून तो आजोळी राहिला आहे आणि लहानाचा मोठा झाला आहे. आम्ही लहानपणापासून लांब राहिल्यामुळे आमच्यात भांडण हा प्रकार झाला नाही. मी केव्हातरी त्याच्यावर चिडेन पण तो कधीच नाही. आमच्यात आहे ते फक्त प्रेम, आमचे मारामारी आणि भांडणाचे किस्सेच नाहीत. आम्हाला कधी बाहेर मित्र -मैत्रिणी शोधायची गरजच नाही पडली. आमचं असं मत आहे की, रक्षाबंधन साजरं नाही केलं तरीही नातं बदलत नाही, भावना बदलत नाही किंवा प्रेम कमी होत नाही. तर रक्षाबंधन हे भावा-बहिणींच्या नात्यातलं एक प्रतीक आहे. कामाच्या निमित्तानी मी साताऱ्यात शूट करत आहे, मुंबईपासून लांब आहे. शूटमधून सुट्टी मिळाली तर आनंदाने घरी जाऊन रक्षाबंधन साजरा कारेन. आम्ही कधी एकमेकांना सल्ला दिला नाही, पण आमचं एक मत आहे की कोणावर अवलंबून राहायचं नाही, काम करत राहायचं आणि स्वाभिमानाने जगायचं.".
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधल्या हृषिकेश शेलारने सांगितले की, ‘माझ्या बहीणी माझ्याहून १४- १५ वर्ष मोठ्या आहेत. पण, आमचं नातं खूप गोड आहे आणि या नात्याचं वैशिष्ट आहे की, मला सख्या बहीणी नाहीत. माझ्या दोन मावस बहिणी आहे आणि त्या सख्याबहिणींपेक्षा जवळच्या आहेत. त्यांनी मला खूप लाडांनी आणि प्रेमानी वाढवलं आहे. बहिणीकडून मिळालेला सल्ला हाच की प्रामाणिकपणे, मन लावून जिद्दीने काम करत राहा एक दिवस यश नक्की मिळेल. हारून जाऊ नकोस. कारण, आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत हे नैतिक समर्थन सातत्यांनी दिले आहे मला. मी जे ही काम करीन त्याचं, कौतुक करून प्रोत्साहन देतात माझ्या बहिणी. कधी आयुष्यात कठीण परिस्थिती आली, तर त्या माझ्यासोबत खंबीर उभ्या राहतात. सगळ्यात मोठ्या बहिणीचे नाव आहे क्रांती ताई तिच्याहून लहान आहे. तिचं नाव आहे चंदन ताई. यावर्षी माझी क्रांती ताई रक्षाबंधनसाठी पुण्याहून मुंबईला येत आहे. औरंगाबादला चंदन ताई असते, तर तिची राखी मला पोस्टांनी येणार आहे. तर असं आमचं रक्षाबंधन साजरं होणार आहे.’
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतल्या कोमल मोरे म्हणते की, ‘माझा लहान भाऊ आहे, ज्याचे नाव आहे अभिजीत. तो माझ्यापेक्षा जवळपास ६ वर्षांनी लहान आहे. आमच्या नात्यात खूप सारं प्रेम आणि थोडंस भांडण, रुसवे फुगवे आहेत, जसं जगात प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं असतं. पण, माझा लहानभाऊ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे जितकं जगात कोणावर नसेल, तितकं माझं माझ्या भावावर प्रेम आहे. अभिजीतचा मला कायम सपोर्ट असतो. मी एक कलाकार आहे आणि बाकी कलाकारांसारखा माझाही संघर्षाचा काळ होता. तेव्हा माझ्यात पॉसिटीव्हिटी राहण्यासाठी तो मला इतर गोष्टीत गुंतवायचा. आमचं रक्षाबंधन खूप स्पेशल असते, कारण जसं मी माझ्या भावाला राखी बांधते, तसे तो ही मला राखी बांधतो, ओवाळतो. यावर्षी पहिल्यांदा असं होईल जेव्हा मी रक्षाबंधनला घरी नसेन. खूप मिस करत आहे मी माझ्या भावाला.’
'नवरी मिळे हिटलरला' मधली वल्लरी विराजने सांगितले, ‘मला लहान भाऊ आहे, जो माझ्याहून ३ वर्ष लहान आहे. तो लॉ-च्या शेवटच्या वर्षाला आहे. आमच्या नात्याबद्दल बोलायचे झाले, तर लहान असताना आम्ही खूप भांडायचो, मस्ती करायचो. पण, जसं आम्ही मोठे होत गेलो. आमची घट्ट मैत्री झाली आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकाला सांगायला लागलो, शॉपिंगला मला एकमेकाची साथ लागतेच. माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट माझ्या आई-बाबांना माहिती नसेल, पण भावाला सगळं माहिती असते. माझ्याहून लहान असला तरीही माझा भाऊ प्रॅक्टिकल विचार करणारा आहे, मी थोडी हळवी आहे. यावेळेस 'नवरी मिळे हिटलरला' शूट असल्यामुळे शूटिंगवरून घरी येऊन, मी माझ्याभावाला राखी बांधणार कितीही उशीर झाला तरीही.’
'लाखात एक आमचा दादा' मधला नितीश चव्हाण म्हणाला की, ‘माझ्या दादाच नाव निलेश चव्हाण आहे. तो माझ्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे. आम्ही फक्त भाऊ नाही, तर छान मित्रही आहोत. कुठे ही बाहेर जायचे असेल, काही नवीन गोष्टीची खरेदी करायची असेल, तर आम्ही दोघे एकमेकांना विचारूनच करतो. मला आयुष्यात काही निर्णय घ्यायचे असतील तर मी त्याचा सल्ला घेतो. आईबाबानंतर तोच माझ्यासाठी आई-वडील आहे असं म्हणायला हरकत नाही, इतकं घट्ट आमचं नातं आहे. दादा सतत माझं मार्गदर्शन करत असतो, चांगलं काय चुकीचं काय सगळं मला सांगतो, कौतुक ही तेवढाच करतो. माझ्या कामात ही काही चुकले असेल, कुठे सुधारणा करता येईल, हे सर्व मला सांगतो. त्याचं एवढं म्हणणं असतं की, स्वतःशी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, कष्ट करत राहा. यावर्षी रक्षाबंधन सातारा किंवा कोल्हापूरमध्ये होऊ शकतं, कोल्हापूर माझं आजोळ आहे काही भाऊबहीण तिथे आहेत. पण, सगळे एकत्र येऊन रक्षाबंधन साजरी करणार.’