Rakhi Sawant Unknown Stories : बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनचे नाव घेताच डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे राखी सावंत. अभिनेत्री तिच्या कामापेक्षा तिच्या वादांमुळे जास्त चर्चेत असते. प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे आणि ती त्याचा पुरेपूर फायदा घेते. आजघडीला राखी सावंत हे एक प्रसिद्ध नाव आहे, पण तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अभिनेत्रीने तिच्या संघर्षमय जीवनाबद्दल अनेकदा बोलताना दिसते. आज राखी सावंतचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी...
राखी सावंत या नावाने ही अभिनेत्री इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. पण हे तिचे खरे नाव नाही. तिचे खरे नाव नीरू भेडा आहे, जे तिच्या पालकांनी तिला दिले होते. पण, राखी सावंत या नावाने तिने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. सावंत हे तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव नाव होते, ज्यांच्याशी तिच्या आईने लग्न केले होते. सावंतांच्या घरात आल्यावर नीरु भेडाची राखी सावंत झाली.
राखी सावंतने स्वत: एका पॉडकास्टमध्ये इंडस्ट्रीतील काळे सत्य समोर आणले होते. राखी म्हणाली होती की, इंडस्ट्रीमध्ये बलात्कार जबरदस्तीने होत नसून संमतीने होतो. मुली स्वत: घाणेरडे कपडे घालून येतात आणि त्यांच्या शरीराचे प्रदर्शन करतात. कामाच्या बदल्यात मुली स्वतः दिग्दर्शकाशी किंवा मेकर्सशी असे संबंध तयार करतात. यावेळी राखीने सांगितले की, कामाच्या बदल्यात एका डायरेक्टने तिच्याकडूनही घाणेरड्या मागण्याही केल्या होत्या. मात्र, राखीच्या नकारा पुढे त्यांना नमतं घ्यावं लागलं.
राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीने ‘बिग बॉस १५’च्या घरात पहिल्या पतीची म्हणजे रितेशची सर्वांना ओळख करून दिली होती. तिच्या लग्नाच्या बातमीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता मात्र, अभिनेत्रीचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. यानंतर राखीने हिंदू धर्म बदलून इस्लाम स्वीकारला. यानंतर राखीने आदिल खान दुर्रानीशी गुपचूप लग्न केले होते.
राखीने आदिलसाठी हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला होता. पण, आदिलने त्याचाच फायदा घेतला. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आदिल हा असा व्यक्ती आहे जो ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणत्याही मुलीसोबत राहू शकत नाही. आदिलने राखीचा बेडरूमचा व्हिडिओ आणि फोटो लीक केल्याचा आरोपही तिने केला आहे, ज्यामुळे तिची खूप बदनामी झाली होती.