Pushpa 2 The Rule Controversy : सध्या सगळीकडे ‘पुष्पा २’ची हवा दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट धमाकेदार कमाई करत आहे, तर दुसरीकडे अनेक वेगवेगळ्या वादांत देखील अडकत आहे. राजपूत नेते राज शेखावत यांनी 'पुष्पा २' या चित्रपटावर क्षत्रिय समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत निर्मात्यांना धमकी दिली आहे. 'पुष्पा २' चित्रपटात 'शेखावत'ची नकारात्मक भूमिका दाखवली आहे, पुन्हा क्षत्रियांचा अपमान केला आहे, करणी सैनिक तयार व्हा . चित्रपटाच्या निर्मात्याला लवकरच फटकवलं जाईल', असे शेखावत यांनी म्हटले आहे.
अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात ‘भंवर सिंह शेखावत’ ही खलनायकी भूमिका साकारत आहे. याच पात्रावरून आता हा नवा वाद सुरू झाला आहे.
चित्रपटातील 'शेखावत' शब्दाचा वारंवार अपमान केल्याने क्षत्रिय समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करत, राजपूत नेत्यांनी हा शब्द चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी निर्मात्यांकडे केली. 'या चित्रपटाने क्षत्रियांचा घोर अपमान केला आहे. 'शेखावत' समाजाला चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही इंडस्ट्री क्षत्रियांचा अपमान करत आहे आणि त्यांनी पुन्हा तेच केले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातून 'शेखावत' शब्दाचा सातत्याने होणारा वापर काढून टाकावा, अन्यथा करणी सेना त्यांना त्यांच्या घरात शिरून फटके डेल, आणि आवश्यकतेनुसार कोणत्याही मर्यादेपर्यंत जाईल', असा इशारा राज शेखावत यांनी दिला आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. निर्मात्यांनी गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित केल्यापासून चित्रपटगृहांमध्ये 'हाऊसफुल' शो पाहायला मिळत आहेत. ‘पुष्पा २’च्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल २९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'पुष्पा २'ने या प्रचंड कलेक्शनसह शाहरुख खानच्या 'जवान'चा हिंदी भाषेतील ओपनिंग डेचा विक्रम मोडला. या चित्रपटाने ‘आरआरआर’चा १५६ कोटींचा विक्रम मोडीत काढत आतापर्यंतचा सर्वात मोठा देशांतर्गत सिनेमा बनण्याचा मान पटकावला आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि मैथरी मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत या भूमिका साकरल्या आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. सुकुमार दिग्दर्शित पुष्पाच्या पहिल्या भागात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.
संबंधित बातम्या