पूर्वी हिमालयाची आध्यात्मिक सफर करणारे रजनीकांत आता आणखी पवित्र ठिकाणांना भेट देण्याची योजना आखत आहेत. साऊथ सुपरस्टार चेन्नई सोडून उत्तराखंडमधील डेहराडून येथून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. डेहराडून विमानतळावर रजनीकांत यांनी एएनआयशी संवाद साधला. ‘दर वर्षी मला नवीन अनुभव येत असतात, ज्यामुळे मी माझा आध्यात्मिक प्रवास पुन्हा पुन्हा सुरू ठेवणार आहे. यावेळीही मला नवे अनुभव मिळतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ते केदारनाथ आणि बद्रीनाथला जाणार आहेत.
अध्यात्म का महत्त्वाचे आहे, याबद्दलही रजनीकांत यांनी भाष्य केले. ‘संपूर्ण जगाला अध्यात्माची गरज आहे, कारण अध्यात्म प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक असणे म्हणजे शांतता अनुभवणे आणि मुळात यात देवावर विश्वास ठेवणे समाविष्ट आहे’, असं रजनीकांत म्हणाले.
नुकतेच रजनीकांत यांनी अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराला भेट दिली. बीएपीएस हिंदू मंदिराच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रजनीकांत यांचे मंदिरात आशीर्वाद घेतानाचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले होते.
संयुक्त अरब अमिरातीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने रजनीकांत यांना गोल्डन व्हिसा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्याने अबू धाबी सरकार आणि त्यांचे मित्र, लुलु ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचे व्हिसा मिळविण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. 'अबू धाबी सरकारकडून प्रतिष्ठेचा युएई गोल्डन व्हिसा मिळाल्याचा मला अभिमान वाटतो,' असे त्यांनी एका व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर रजनीकांत यांनी टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित 'वेट्टायन' या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ‘वेट्टायन’मध्ये अमिताभ बच्चन देखील आहेत. रजनीकांत यांचा १७० वा चित्रपट असलेला ‘वेट्टायन’ हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रजनीकांत आणि अमिताभ यांनी मुंबईत एकत्र काही दृश्यांचे चित्रीकरण करताना दिसले होते. अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर आपला आणि रजनीकांतयांचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ आणि रजनीकांत मिठी मारताना आणि मस्ती करताना दिसत आहेत.
ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'थाला द ग्रेट रजनीसोबत पुन्हा काम करण्याचा मला अभिमान वाटतो. तो अजिबात बदललेला नाही.. विनम्र असलेला, तोच साधा नम्र माणूस!!" यापूर्वी प्रॉडक्शन कंपनीने रजनीकांत यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टायटल टीझर लाँच केला होता. या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबाती, रितिका सिंह, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाचे संगीतकार आहेत. रजनीकांत त्रिवेंद्रम, तिरुनेलवेली आणि तूतीकोरिन अशा विविध ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिसले.