दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्स नुसार, चेन्नई पोलिसांनी सांगितले की, रजनीकांत यांना रात्री उशिरा अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता रुग्णालयाने रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईमधील ओपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर आता रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे. '३० सप्टेंबर २०२४ रोजी रजनीकांत यांना चेन्नईमधील ओपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी नस सुजली होती. सर्जरी न करता यावर उपचार करण्यात आले आहेत. कार्डीओलॉजिस्ट डॉक्टर साई सतीश यांनी रजनीकांत यांच्यावर उपचार केले असून रक्तवाहिनीला आलेली सूज ही कमी झाली आहे. चाहत्यांना आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांना सांगण्यात आनंद होत आहे की रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे' असे निवेदनात म्हटले आहे.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत यांची २०१६ मध्ये सिंगापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना काल रात्री चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तीव्र पोटदुखीची तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी फारसे काही सांगितले नाही. मात्र, सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
लवकरच रजनीकांत यांचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी 'वेट्टियान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. दुसरा चित्रपट 'कुली' पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चाहत्यांमध्ये त्यांच्या या दोन्ही चित्रपटांबाबत उत्सुकता पाहायला मिळते.