साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, आता रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, ही बातमी येताच त्यांच्या तब्येतीची चाहत्यांना खूप काळजी वाटू लागली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, चेन्नई पोलिसांनी सांगितले की, रजनीकांत यांना रात्री उशिरा अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी एएनआयला दिलेल्या निवेदनात सांगितले की, सध्या सुपरस्टारची प्रकृती स्थिर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत यांची २०१६ मध्ये सिंगापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना काल रात्री चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तीव्र पोटदुखीची तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी फारसे काही सांगितले नाही. मात्र, सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, रजनीकांत यांच्या अचानक रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचे चाहते चांगलेच घाबरले आहेत. अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते सतत प्रार्थना करत असतात. सध्या रजनीकांत हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
रजनीकांत त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे एक नाही तर, दोन चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. रजनीकांतचा यांचा आगामी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नाव 'वेट्टियान' असे आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. तर, त्यांचा दुसरा चित्रपट 'कुली' पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत ४९ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहतेही रजनीकांत यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.