Rajesh Khanna Death Anniversary: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांचे नाव घेतले जाते. राजेश खन्ना यांनी जितकी लोकप्रियता मिळवली तितकी आजवर इतर कोणत्याही अभिनेत्याला मिळवता आलेली नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत एक काळ असा होता, जेव्हा २० वर्ष केवळ राजेश खन्ना यांच्या नावाची हवा होती. एखाद्या चित्रपटात राजेश खन्ना भूमिका करणार हा एकच फॅक्टर चित्रपट सुपरहिट ठरण्यात महत्त्वाचा होता. मात्र, त्याच दरम्यानच्या काळात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली. अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीचा मोठा परिणाम राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीवर झाला होता.
राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. परंतु, काही काळानंतर त्यांच्या स्टारडमलाही उतरती कळा लागली होती. त्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत प्रवेश केला, तेव्हा राजेश खन्ना नावाची जादू लोकांमधून ओसरू लागली. या मागचं मुख्य कारण होतं कारण होतं अॅक्शनपट... अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत अॅक्शनपटांची रांगच लावायला सुरुवात केली होती. तर, दुसरीकडे राजेश खन्ना यांची इमेज रोमँटिक हिरो अशीच बनून राहिली होती. यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं.
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा, त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स कमी येऊ लागल्या होत्या. अखेर अशा पडत्या काळात त्यांनी छोट्या पडद्यावरही नशीब आजमावले. या दरम्यान त्यांनी अनेक टीव्ही मालिकाही केल्या. मात्र, या टीव्ही मालिकांमधील भूमिकेसाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मोठ्या कष्टाने त्यांना भूमिका मिळत होत्या. यामुळेच ते मानसिकरित्या देखील खचून गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांना कर्करोगाची लागणही झाली. एकीकडे त्यांचं व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. तर, दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या.
२०११मध्ये राजेश खन्ना यांना कॅन्सरचे निदान झाले होते. पण, त्यांना ही गोष्ट फक्त त्यांच्या जवळच्या लोकांपुरती मर्यादित ठेवायची होती. आपल्याला कर्करोग झाल्याचे चाहत्यांना कळू नये यासाठी त्यांनी सगळ्यांनाच सक्त ताकीद देऊन ठेवली होती. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाख करण्यात आले होते. १६ जुलै रोजी ते घरी परतले होते. मात्र, १८ जुलै रोजी राहत्या घरातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कर्करोग असल्याचा खुलासा झाला होता.
संबंधित बातम्या