Suraj Chavan In Marathi Movie: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाने सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार सुरज चव्हाण. सुरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत, त्यांच्या हृदयावर राज्य केलं. 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सुरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. खेळ समजला नसला, तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सुरज स्वतःला 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सिद्ध करताना दिसतोय.
छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रियॅलिटी शोद्वारे सुरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला, तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सुरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'राजाराणी' या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मनं जिंकली होती. आता या सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार्या या चित्रपटात सुरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सुरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत सुरज चव्हाण दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सुरजचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.