छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ आता ऑफ एअर गेली असली, तरी या मालिकेतील कलाकार काही ना काही कारणाने चर्चेत आहेत. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार ही घराघरात लोकप्रिय झाली होती. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत शिवानी सोनार हिने ‘संजीवनी ढाले पाटील’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने शिवानीला मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख मिळवून दिली. आता शिवानीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गुढीपाडव्याचे निमित्त साधून अभिनेत्री शिवानी सोनार हिने साखरपुडा उरकला आहे. स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून तिने चाहत्यांना हा आनंदाचा धक्का दिला आहे.
अभिनेत्री शिवानी सोनार हिने अभिनेता अंबर गणपुले याच्यासोबत साखरपुडा केला आहे. शिवानी सोनारप्रमाणेच तिचा होणारा नवरा अंबर गणपुले हा देखील मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित चेहरा आहे. अंबर गणपुले याला चाहते त्याच्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे ओळखतात. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अंबर गणपुले यांने आदित्य इनामदार ही भूमिका साकारली होती. आता दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर चाहते त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव करत आहेत.
शिवानी आणि अंबर एकमेकांना डेट करत होते, याबद्दल कुणालाही फारशी माहिती नव्हती. आता साखरपुड्याचा एक छोटासा व्हिडीओ शेअर करून शिवानी सोनारने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिवानी आणि अंबर यांचे साखरपुड्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते आता दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. साखरपुड्यासाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. तर, अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत होती.
कुठेही डेटिंगची वाचता नाही, की प्रेमात पडल्याची चर्चा नाही तर या दोघांनी थेट साखरपुडा उरकूनच आपल्या नात्याची जाहीर घोषणा केली आहे. या सीक्रेट साखरपुड्यानंतर आता दोघांचेही चाहते खूप खुश झाले आहेत. दोघांच्या या साखरपुडा सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता ही जोडी लग्न कधी करणार आहे, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.