Raja Rani Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात एकामागोमाग एक आशयघन चित्रपट येत असताना, आता पुन्हा एकदा गावरान तडका असलेली मराठमोळी अशी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजवर इतिहासात अनेक जोड्या अजरामर झाल्या आणि या जोड्यांनी प्रेम या शब्दाची व्याख्या तयार केली. अशीच एक गावाकडील लव्हस्टोरी 'राजराणी' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बरं ही प्रेमकहाणी नुसतीच प्रेमकहाणी नसून, एक थरारक चित्र डोळ्यासमोर उभी करणारी आहे. येत्या ४ ऑक्टोबर २०२४ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत असून, प्रेमीयुगुलांवर राज्य करायला सज्ज होत आहे. विशेष म्हणजे ही एक सत्य घटनेवर आधारित प्रेमकहाणी आहे.
शहरातील प्रेमकहाणीला डोळ्यासमोर ठेवून आता खेड्यापाड्यातही याचं प्रमाण वाढलेलं चित्र दिसत आहे. अशावेळी समाजाकडून होणारा विरोध, कुटूंबाकडून मिळणारा नकार आणि यावेळी प्रेमीयुगुलांनी घेतलेला निर्णय याचे हुबेहूब वर्णन ‘राजाराणी’ या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. याशिवाय भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे, सूरज चव्हाण या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल, याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे. म्हणूनच एक थरारक प्रेमकहाणी अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची कथा रंजक असणार यात शंका नाही. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला ‘राजाराणी’ आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.
'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलंआहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.