Raj Kundra ED Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती अभिनेता राज कुंद्रा याला आता अश्लील व्हिडीओ प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. कथित अश्लील व्हिडीओ प्रकरणामध्ये राज कुंद्राचे नाव आल्यानंतर ईडीने देखील मे २०२२मध्ये या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली होती. यानंतर राज कुंद्रा याचे नाव या प्रकरणात चांगलेच गोवल्याने त्याला तुरुंगात देखील जावे लागले होते. पण, आता राज कुंद्रा आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणात ईडीला थेट संबंध सापडलेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडी यूके स्थित कंपनी 'केनरिन'च्या विविध बँक व्यवहारांशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित करत आहे. तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, केनरिनचे मालक प्रदीप बक्षी हे हॉटशॉट अॅपचे अधिकृत प्रवर्तक आणि राज कुंद्रा याचे मेहुणे आहेत. ही कंपनी भारतातील कंपन्यांसोबत अनेक व्यवहारांमध्ये गुंतलेली आहे. जानेवारी २०१९मध्ये आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ सौरभ कुशवाह यांनी राज कुंद्राच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणि व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेऊन, कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. तर, राज कुंद्रा याने ही ऑफर स्वीकारली होती.
राज कुंद्रा २०१९मध्ये 'एएमपीएल'शी संबंधित होता. यावेळी त्यांनी हॉटशॉट अॅप तयार केले होते. हेच अॅपनंतर केनरिनला विकले गेले. मात्र, राज कुंद्रा यांच्या 'विहान' कंपनीने 'हॉटशॉट अॅप'साठी केनरिनसोबत सहकार्य केले होते. विहान आणि उर्वरित कंपनीच्या खात्यांमध्ये किती, केव्हा आणि कोणत्या खात्यांमधून मोठी रक्कम जमा झाली, याची पडताळणी करण्यासाठी बँक व्यवहार तपासले जात आहेत.
राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित बँक खात्यांमधील सर्व व्यवहारांचे ईडी ऑडिट करत आहे. हॉटशॉट अॅपवर अपलोड केलेला अॅडल्ट कंटेंट थेट राज कुंद्राशी संबंधित आहे की, नाही हे अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा यांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच, आपला या प्रकरणात काहीही संबंध नाही, असे देखील त्याने म्हटले होते.
संबंधित बातम्या