राज कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय नावाजलेले नाव. ते लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे चित्रपट आजही सिनेरसिकांचे मनोरंजन करतात. पण राज कपूर यांनी केवळ हिंदी इंडस्ट्रीमध्येच नाही तर मराठी इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. हे ऐकून तुम्ही चकीत झाला असाल. पण राज कपूर यांनी मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम केले आहे. आता हा सिनेमा कोणता तुम्हाला माहिती आहे का? नाही ना चला जाणून घेऊया...
राज कपूर यांनी अनेकदा मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एकदा हा योग जुळून आला. राज कपूर यांनी 'कलंक' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी या सिनेमातल्या एका गाण्यामध्ये काम केले आहे. केवळ राज कपूरचा नाही तर त्यांचा भाऊ शम्मी कपूर देखील या चित्रपटातील गाण्यात दिसले होते.
‘कलंक’ या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, रवींद्र महाजनी आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक डॉ. माईक पवार यांनी केली. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्या गाण्याला गीताना नागेश राज यांचे संगीत लाभले आहे. तर मा. दा. देवकाते, विनायक रहातेकर आणि अनंत जाधव यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे.
वाचा: 'मिस्टर इंडिया'मधील तेजसाहेब आठवतायेत का? आहेत महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई
'कलंक' या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सर्व कलाकारांनी हा सिनेमा पाहिला. राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी देखील चित्रपटातील गाणे पाहिले. पण सुरुवातीला या चित्रपटाचे नाव कलंक ऐवजी 'शरण तुला भगवंता' असे होते. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे निर्मात्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे नाव 'धडाका' असे ठेवण्यात आले. पण तरीही हा सिनेमा काही चाले ना. शेवटी पुन्हा एकदा या सिनेमाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा या सिनेमाचे नाव 'कलंक' असे ठेवण्यात आले आहे. त्यावेळी असे तीन वेळा नाव बदलण्यात आलेला हा पहिला सिनेमा होता.