Raj Kapoor Birth Anniversary Special: आज (१४ डिसेंबर) राज कपूर यांची जन्मशताब्दी आहे. या निमित्ताने चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. राज कपूर यांनी बॉलिवूडच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली, असे म्हटले जाते. बॉलिवूडचे 'शो मॅन' राज कपूर यांनी मनोरंजन विश्वाला अनेक हिट चित्रपट दिले. 'आवरा', 'श्री ४२०', 'प्रेम रोग' या सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. राज कपूर यांचे खरे नाव रणबीर कपूर होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नाव बदलले होते. आज त्यांचे हेच नाव त्यांचा नातू रणबीर कपूर याला देण्यात आले आहे. रणबीर नेहमीच आपापल्या आजोबांबद्दल भरभरून बोलताना दिसतो. माझ्या आजोबांची कथा केवळ मीच चांगल्याप्रकारे लिहू शकतो, असे देखील रणबीर म्हणतो.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आजोबांच्या अभिनयाचा नाही तर, त्यांच्या दिग्दर्शनाचा फॅन आहे. राज कपूर यांनी दिग्दर्शित केले सगळेच चित्रपट रणबीर कपूर याला आवडतात. त्यांच्या दिग्दर्शनाचा मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडला असल्याचे रणबीर कपूर नेहमीच म्हणतो. रणबीर कपूर म्हणतो की, 'मला गर्व आहे की, मी राज कपूर यांचा नातू आहे. त्यांच्यामुळेच आज आपल्या संपूर्ण घराण्याला इतकं महत्त्व आहे. यासाठी मी नेहमीच त्यांचा आभारी असेन. कपूर घराण्यातील मुलगा असल्यामुळेच मला मनोरंजन विश्वात सहज स्थिरस्थावर होता आले.
रणबीर कपूर अवघ्या सहा वर्षांचा होता, तेव्हा राज कपूर यांचे निधन झाले. राज कपूर यांच्या काही मोजक्याच आठवणी रणबीर कपूरकडे आहेत. मात्र, त्यांची एक अनमोल संपत्ती आपल्याकडे असल्याचे रणबीर कपूर नेहमीच सांगतो. आजोबांची ही अनमोल आठवण रणबीर कपूरला त्याच्या एका चाहत्याने दिली होती. रणबीर कपूर याचा सावरिया हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा, हरियाणातील एका चाहत्याने त्याला राज कपूर यांची सही असलेलं एक पत्र दिलं होतं. १९ मार्च १९५० रोजी राज कपूर यांनी ही नोट लिहिली होती. यात त्यांनी लिहिले होते की, 'विनम्रता हाच कलाकाराचा मोठा गुण आहे' आणि त्यावर सही केली होती. आजही हे ऑटोग्राफ असलेलं पत्र रणबीर कपूरने आपल्याजवळ जपून ठेवलं आहे.
आजोबांचा बायोपिक बनवण्याचा विचार केला तर, त्याचं लिखाण मीच करेन, असे वक्तव्य रणबीर कपूर याने केले आहे. त्यांचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं कुणीच लिहू शकत नाही, असा विश्वास देखील त्याला आहे.