प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान सध्या चर्चेत आहेत. त्यांचा मॅनेजर सलमान अहमद यांनी आरोप केल्यानंतर राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी राहत फतेह अली खान यांची कसून चौकशी केली. आता राहत फतेह अली खान यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अटकेची बातमी समोर आल्यानंतर राहत फतेह अली खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका… असे म्हणत अटकेचे सत्य नाकारले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुर्ज दुबई पोलिसांनी १३ जुलै २०२४ रोजी राहत फतेह अली खानविरोधात औपचारिकपणे गुन्हा दाखल केला होता. राहत यांना लाहोर येथून एका कार्यक्रमासाठी दुबईमध्ये आले असता विमातळावरच त्यांना अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले.
राहत फतेह अली खान यांनी सक्षम जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी जामिनावर गायकाची सुटका केली. सांगायचं झालं तर, राहत फतेह अली खान आणि माजी मॅनेजर सलमान यांनी एकमेकांवर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. राहत यांचे स्थानिक मॅनेजर आणि दुबईतील प्रवर्तक यांनी अटकेनंतर जामीनासाठी वकिलांची नियुक्ती केली. राहत यांच्यासोबत दुबईत त्याचा मेहुणा बक्का बुर्कीही आहे.
जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राहत यांना त्यांच्या माजी मॅनेजरने मानहानीच्या तक्रारीवरून सोमवारी दुबईत अटक केली. राहत यांनी काही महिन्यांपूर्वी वादातून मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले होते.
वाचा: 'बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?
या वर्षाच्या सुरुवातीला राहत एका व्यक्तीला थप्पड मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या व्हिडिओत राहत 'माझी बाटली कुठे आहे?' असा प्रश्न विचारत चप्पलने त्या व्यक्तीला वारंवार मारहाण करताना आणि थप्पड मारताना दिसत आहेत. त्यानंतर मन की लगन आणि जिया धडक धडक सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या गायकाने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत त्याद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
संबंधित बातम्या