Raghu 350 Marathi Movie Trailer: मारामारी, अॅक्शन, न्यायासाठीची लढाई आणि मिळणार यश हे सारं मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक वाटतं. आजवर असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यात न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली. यात भर घालत सोशल मीडियावर एका चित्रपटाच्या ट्रेलरने हवा केली आहे. हा चित्रपट म्हणजे 'रघु ३५०'. आगामी मराठी चित्रपट 'रघु ३५०'च्या पोस्टरने, टीझरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या २.३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. प्रेमासाठी, सत्तेसाठीची ही लढाई ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. चिन्मय उदगीरकर, विजय गीते आणि अदिती कांबळे यांचा लव्ह ट्रँगल ट्रेलरची उत्सुकता वाढवत आहे. नेमक कोणी कोणावर मात करत विजय मिळवला, सत्तेसाठी कोण बदललं, कोणाचा विजय झाला याची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहणं रंजक ठरत आहे. समोर आलेल्या या ट्रेलरमधील तुफान राड्यांवरुन प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार, हे मात्र गुपित ठेवण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत 'रघु ३५०' चित्रपटाबद्दल बरीच कुजबुज सुरू होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा पाठमोरा तरुण नेमका आहे तरी कोण याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर हे गुपित देखील उलगडलं आहे. सोशल मीडियावर 'रघु ३५०' चित्रपटाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि संगीत अनावरण सोहळ्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या चित्रपटातून धुमाकूळ घालण्यास सज्ज असलेल्या कलाकारांची नावं आता समोर आली आहेत.
'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते, अदिती कांबळे, तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, रामभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलवली आहे. तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला चित्रपटात धुमाकूळ घालायला सज्ज होत आहे.