मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ संदर्भातील महेश टिळेकरांची पोस्ट व्हायरल!
Raavrambha
Raavrambha

Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ संदर्भातील महेश टिळेकरांची पोस्ट व्हायरल!

26 May 2023, 8:39 ISTHarshada Bhirvandekar

Raavrambha Marathi Movie: ‘रावरंभा’ हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची या चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Raavrambha Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा भरणा पाहायला मिळत आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ मोठ्या पडद्यावर चितारण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढी पाहायला मिळत आहे. या सगळ्यादरम्यान कथानकाची तोडमोड, कलाकारांची अयोग्य निवड यामुळे असे काही चित्रपट वादांत देखील अडकतात. मात्र, ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटात ऐतिहासिक बाजू सांभाळत एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ‘रावरंभा’ हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, हा चित्रपट पाहून आलेल्या दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून ‘रावरंभा’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेश टिळेकर यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘डोळ्यात आणि ह्रदयात साठवावा 'रावरंभा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले. पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच 'रावरंभा' सिनेमा आहे.

Gori Nagori: ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्रीला मारहाण; पोलिसांवरही केले गंभीर आरोप

पुढे त्यांनी लिहिले की, ‘हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले, फिल्मी वाटावे असे संवाद या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो. प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला "कधी संपतोय सिनेमा?" हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत. सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेंबीच्या देठापासून दात ओठ खात राक्षसासारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो. सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणणारा आहे की, जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की, संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही.’

‘सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब. युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणणारा. शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो. नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की, नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच, पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते’, असे देखील ते म्हणाले.

Ashish Vidyarthi Wedding: वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

‘चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत. निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे... मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास 'रावरंभा' अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील’, असे महंत महेश टिळेकर यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

विभाग