R Madhavan Post: बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच माधवनचा मुलगा देखील देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहे. अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन हा क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहे. वेदांत आपल्या धमाकेदार कामगिरीने नेहमीच अनेक पदकं पटकावतो. आता देखील त्याच्या मुलाने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. जागतिक स्तरावरील जलतरण स्पर्धेत ५ सुवर्ण पदकं मिळवत त्याने देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत याने अभिनयाच्या जगापासून दूर खेळात नशीब आजमावले आहे. त्याने आपल्या दमदार कामगिरीने नेहमीच देशाचा गौरव केला आहे. आता देखील आर माधवनने आपल्या मुलाचा हा विजय सर्वांसोबत शेअर केला आहे. आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत भारतासाठी ५ सुवर्णपदके जिंकली आहेत. या चॅम्पियनशिपदरम्यानचे आपल्या मुलाचे काही फोटो शेअर करून अभिनेत्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.
वेदांत माधवनने ५८व्या MILO/MAS मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण स्पर्धेतही भाग घेतला. आर माधवनने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वेदांत तिरंगा आणि मेडलसोबत विजयी पोज देताना दिसत आहे. तर, एका फोटोत माधवनची पत्नी आणि वेदांतची आई सरिता बिर्जेही आपल्या मुलाच्या विजयावर खूप आनंदी झालेली दिसत आहेत. मुलाने जिंकलेली सर्व पदके त्याच्या गळ्यात आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य देखील दिसत आहे.
आर माधवनने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांसह वेदांतने भारतासाठी ५ गोल्ड मेडल पटकावले. (५० मी, १०० मी, २०० मी, ४०० मी आणि १५०० मी) मलेशियन वयोगट चॅम्पियनशिप २०२३ या आठवड्याच्या शेवटी आयोजित करण्यात आली होते. आर माधवनच्या या पोस्टवर, त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री-राजकारणी खुशबू सुंदर यांनी लिहिले की, ‘अभिनंदन मॅडी.. वेदांतला खूप प्रेम.’ गेल्या काही वर्षांत वेदांत माधवनने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजयांची नोंद करून देशाचे नाव उंचावले आहे. आर माधवनच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहताना दिसला आहे. एकीकडे अभिनेता आर माधवन दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवत आहे. तर, दुसरीकडे त्याचा मुलगा अभिमानास्पद कामगिरी करून देशाची मान उंचावत आहे.
संबंधित बातम्या