आपल्या गोड हसण्याने कित्येक चाहतींच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही फिट असणारा माधवन आपल्या अभिनयाने बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्यांना टक्कर देतो. माधवनच्या अभिनयासोबतच त्याचा लूक चाहत्यांचा प्रचंड आवडता आहे. आजही कित्येक मुली त्याच्यासाठी वेड्या आहेत. झारखंड मधील जमशेदपूर जिल्ह्यात जन्मलेला मॅडी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु, माधवनला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याला आर्मी ऑफीसर बनून देशाची सेवा करायची होती.
माधवन सुरुवातीपासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होता. त्याच्या शाळेतही तो सांस्कृतिक विभागाचा प्रतिनिधी होता. त्याने कॅनडा मध्येही त्याच्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं होतं. शाळेत तो एक चांगला एनसीसी केडेड होता. माधवनला अभिनेता म्हणून करिअर करायचं नव्हतं. त्याला नेहमीच इंडियन आर्मीत भरती होऊन देशाची सेवा करायची होती. त्याने त्यासाठी तयारी देखील केली होती. मात्र जेव्हा तो परीक्षा देण्यासाठी गेला तेव्हा माहित पडलं की तो परीक्षेसाठी ६ महिने छोटा आहे. त्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर त्याने हा विचार डोक्यातून काढून टाकला.
माधवनने १९९७ साली चंदनाच्या जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याने मणिरत्नम यांच्या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिली होती. मात्र तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं सांगत त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा मालिकांमध्ये काम करणं सुरू ठेवलं. हळूहळू त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक माधवनचं कौतुक करू लागले. त्यानंतर माधवनने १९९८ साली एका इंग्रजी चित्रपटात काम केलं मात्र तो बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे माधवन दाक्षिणात्य चित्रपटात काम करू लागला. तिथे मात्र त्याने अनेकांची मनं जिंकली. 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आजवर त्याच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला.
संबंधित बातम्या