Pushpa 2 Trailer New Record : अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा २’ चित्रपटाचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला आणि त्यासोबतच या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलर रिलीज सोहळ्यासोबतच पाटणा येथील गांधी मैदानावर एक मेगा इव्हेंट देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे चित्रपटाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमात चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला आणि ट्रेलरलाही उदंड प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच एक विक्रम रचला आहे.
'पुष्पा २'च्या ट्रेलरने रिलीज होताच एक मोठा विक्रम केला आहे. ट्रेलरला २४ तासांत यूट्यूबवर १०२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर १०० दशलक्ष व्ह्यूचा टप्पा ओलांडणारा तिसरा भारतीय चित्रपट ट्रेलर ठरला आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. हिंदी ट्रेलरला सर्व भाषांमध्ये सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहे. २४ तासांत याला ४९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले, त्यामुळे हा एक मोठा रेकॉर्ड बनला आहे. त्यानंतर ४४ दशलक्ष व्ह्यूजसह तेलुगू ट्रेलरचा दुसरा क्रमांक लागतो. तर, या चित्रपटाच्या तमिळ ट्रेलरला ५.२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले. ‘पुष्पा २’च्या कन्नड आणि मल्याळम ट्रेलरला १.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले.
‘पुष्पा २ : द रूल’ हा चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान कोणतीही सुट्टी नाही. असे असूनही, चित्रपटाच्या सोलो रिलीज, प्रीमियम तिकीट आणि आयमॅक्स रिलीजमुळे, तो कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो. या चित्रपटाचे हिंदीतील ओपनिंग कलेक्शन अंदाजे ५५-६० कोटी इतके होईल असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे, तेलुगूमध्ये हा चित्रपट ७०-८० कोटींची कमाई करेल आणि हा आकडा ८० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये १२ ते १५ कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट जवळपास १५० कोटी रुपयांची कमाई करू शकतो, असे म्हटले जात आहे.
'पुष्पा २: द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. याआधी 'पुष्पा २: द रुल' १५ ऑगस्टला रिलीज होणार होता, पण त्याच्या निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख ६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, आता हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी जर तुम्ही ‘पुष्पा भाग १’ बघण्याचा विचार करत असाल, तर ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे.