Pushpa 2 Trailer Launch Viral Video : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. यावेळी चित्रपटाचा अभिनेता अल्लू आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण्यातील गांधी मैदानातून अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. यावेळी साऊथ सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान, या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी टॉवरवर चढताना दिसत आहेत.
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी लाँच करण्यात आला. २ मिनिटे ४८ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन एका दमदार भूमिकेत दिसत आहे. या ट्रेलरची खास गोष्ट म्हणजे हा ट्रेलर बिहारमधील पाटणा येथे लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमानिमित्त पाटणा येथील गांधी मैदानावर मोठी गर्दी झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटणातील लोकांनी चांगलाच गोंधळ घातला. या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी पाचची ठेवण्यात आली होती. त्यावेळी मैदान खचाखच भरले होते. पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यांना पाहण्यासाठी लोक खांब आणि भिंतींवर चढले होते. दोन्ही स्टार्सच्या आगमनाला उशीर झाल्यामुळे बिहारच्या लोकांनी गोंधळ घातला.
अशा परिस्थितीत उपस्थित जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसही तेथे उपस्थित होते. अल्लू वेळेवर मंचावर न आल्याने गांधी मैदानात लोक चप्पल आणि बॉटल्स फेकू लागले. त्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. 'पुष्पा २'चा ट्रेलर लाँच होताच चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांचे नियंत्रण सुटले आणि ते बॅरिकेड्स तोडून स्टेजकडे जाऊ लागले होते. अल्लू अर्जुन स्टेजवर उशिरा पोहोचल्याने प्रेक्षकांची नाराजी आणखी वाढली. यावेळी लोक चप्पल चक्क ड्रोनप्रमाणे हवेत उडवताना दिसले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कार्यक्रम तणावपूर्ण झाला. गर्दीत हाणामारी झाली आणि व्हीआयपी गॅलरीत पाण्याच्या बाटल्याही फेकल्या गेल्या. पोलिसांनी चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन केले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक, चित्रपटाचे कार्यकारी निर्माते बाबू शाही यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, बिहारमध्ये ‘पुष्पा २’चा ट्रेलर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्यक्रमात प्रवेश पूर्णपणे विनामूल्य होता, मात्र प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागला. बिहारमध्ये 'पुष्पा: द राइज'ने त्याच्या हिंदी आवृत्तीत १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन निर्मात्यांनी ट्रेलर लाँचसाठी मोठ्या शहरांऐवजी पाटणा शहराची निवड केली.
'पुष्पा २: द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. याआधी 'पुष्पा २: द रुल' १५ ऑगस्टला रिलीज होणार होता, पण त्याच्या निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख ६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. याआधी जर तुम्ही ‘पुष्पा भाग १’ बघण्याचा विचार करत असाल, तर ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे.