Pushpa 2 The Rule OTT Release Update : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आग लावत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत धुमाकूळ घातला आहे. अशातच आता 'पुष्पा २'च्या ओटीटी रिलीजसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. 'पुष्पा २' पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२५मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. दरम्यान, आता खुद्द 'पुष्पा २'च्या प्रॉडक्शन हाऊसनेच या चर्चेमागचे सत्य सांगितले आहे.
खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'पुष्पा २' नव्या वर्षात म्हणजेच ९ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. 'पुष्पा २'च्या निर्मात्यांनी या अफवांचे खंडन केले असून, या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे म्हटले आहे. मैत्री मुव्हीजने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एका पोस्टद्वारे या वृत्ताचे खंडन केले आहे. निर्मात्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "पुष्पा २ द रूलच्या ओटीटी रिलीजबद्दल अफवा पसरत आहेत. या सर्वात मोठ्या सुट्टीच्या हंगामात सर्वात मोठा चित्रपट 'पुष्पा २'चा आनंद फक्त मोठ्या पडद्यावर घ्या. हा चित्रपट ५६ दिवसांच्या आधी कोणत्याही ओटीटीवर येणार नाही. सध्या वाईल्ड फायर पुष्पा फक्त जगभरातील चित्रपटगृहांमध्येच दिसणार आहे.'
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २ द रूल' हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर झुकण्याचे नावच घेत नाहीये. 'पुष्पा २ द रूल'ने पंधरा दिवसांत एकट्या हिंदीमध्ये ६३२.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यूमधून या चित्रपटाने १०.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १६४.२५ कोटींची कमाई करत अनेक मोठे विक्रम मोडले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा २'ने १६व्या दिवशी १३.७५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत १००४.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या