Pushpa 2 Advance Booking : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच चांगला चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग खूपच जोरदार झाले असून, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचा चांगला आकडा येण्याची शक्यता आहे.
सॅकनिल्कच्या अॅडव्हान्स बुकिंग रिपोर्टनुसार, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून ६२.२२ कोटींची कमाई केली आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' या चित्रपटाची भारतात आतापर्यंत प्रत्येक भाषेतील २१ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. ब्लॉक सीटशिवाय अॅडव्हान्स बुकिंगची एकूण रक्कम ६२.२२ कोटी रुपये आहे आणि ब्लॉक सीटसह ती ७७.२ कोटी रुपये आहे, जी बरीच मोठी आहे.
आज म्हणजेच ४ डिसेंबरला या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण हा दिवस म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचा शेवटचा दिवस असेल आणि ज्या प्रकारे या चित्रपटाची क्रेझ आहे, ते पाहता हा चित्रपट धमाकेदार कमाई करेल हे छातीठोकपणे सांगितले जात आहे. १०० कोटींकहा टप्पा गाठण्यासाठी आता ३० कोटी रुपयांची कमी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट १०० कोटी कमवून नवा विक्रम रचू शकतो.
ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा चित्रपट आठवड्याच्या मध्यात म्हणजेच कामाच्या दिवशी ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असला तरी प्रेक्षकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद जबरदस्त आहे. पहिल्या दिवशी अनेक जण हा चित्रपट पाहणार आहेत. चित्रपटाची अॅडव्हान्स विक्री चांगली असून बॉक्स ऑफिस कलेक्शनही ऐतिहासिक ठरू शकते, असे वाटत आहे. जर सर्व काही सुरळीत राहिले तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरू शकतो. हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट उद्या म्हणजे ५ डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘पुष्पा २ : द रूल’ रिलीज होण्यापूर्वीच जबरदस्त कमाई करत आहे. ‘पुष्पा २ : द रुल’मध्ये मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल आहेत. चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स आणि सुकुमार यांनी केली आहे.