दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'पुष्पा २: द रूल' हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर 'पुष्पा २: द रूल' सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना एका नेटकऱ्याने केलेल्या रिव्ह्यूचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
पुष्पा २: द रूल सिनेमाचा रिव्ह्यू करताना नेटकरी म्हणाला की, 'चित्रपटात लॉजिकचा अभाव आहे आणि सुशिक्षित लोक त्याचे कौतुक करणार नाहीत. चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन गुंडांशी लढण्यासाठी दाताचा वापर करतो. तो दाताचा वापर करुन गुंडांशी चार हात करतो असा सीन दाखवण्यात आला आहे. केवळ अशिक्षित लोकच या चित्रपटाचे कौतुक करतील. आमची चूक अशी आहे की, आम्ही सुशिक्षित असूनही चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो.'
सोशल मीडियावर या नेटकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट आल्या आहेत. एका यूजरने, या रिव्ह्यूशी असहमती दर्शवली आहे. प्रेक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल काही युजर्सनी समीक्षकावर टीका केली. एका युजरने कमेंट केली की, "मी नेहमी म्हणतो की जर तुम्हाला साऊथ इंडियन मसाला चित्रपट बघायचा असेल तर मेंदू घरी ठेवा आणि फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पहा. ही बौद्धिकतेचा वापर करणारा सिनेमा नाही." आणखी एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, 'मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तरीही मला हा चित्रपट आवडला. खास करुन अॅक्शन सीन्स.' दुसऱ्या एकाने, "चित्रपट मनोरंजनासाठी आहे जर तुम्हाला चित्रपट आवडला नसेल तर त्यावर टीका करा पण लोकांचे शिक्षण काढू नका, करमणुकीचा प्रश्न असताना त्यांचे शिक्षण का महत्त्वाचे आहे ?" अशी कमेंट केली आहे.
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल
अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २ : द रूल हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याच्या कलेक्शनने अनेक विक्रम मोडले आहेत. हा अॅक्शन थ्रिलर २०२१ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा : द राइजचा सिक्वल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद यांच्याशिवाय बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या