मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: माओवाद्यांशी कनेक्शन असलेल्या ‘या’ ठिकाणी होणार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चं शूटिंग!

Pushpa 2: माओवाद्यांशी कनेक्शन असलेल्या ‘या’ ठिकाणी होणार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चं शूटिंग!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 10, 2023 08:13 AM IST

Pushpa 2 Shooting Update: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू असून, त्या विषयीची एक मोठी अपडेट आता समोर आली आहे.

Pushpa 2
Pushpa 2

Pushpa 2 Shooting Update: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुप्षा २’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. अल्लू अर्जुन याच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाची एक खास झलक पाहायला मिळाली. ‘पुप्षा २’मधील अल्लू अर्जुनचा लूक पाहून आता चाहते देखील आतुर झाले आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू असून, त्या विषयीची एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचं शूटिंग आता एका अशा ठिकाणी होणार आहे, जिथे आधी माओवाद्यांचा अड्डा होता.

ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील स्वाभिमान आंचलमध्ये ‘पुष्पा २’चे काही सीन शूट केले जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाने या संदर्भात संबंधित प्रोडक्शन हाऊसला परवानगी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील स्वाभिमान आंचल हे ३७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. हा भाग २००८ ते २०२१ दरम्यान माओवाद्यांच्या हिंसाचाराचा साक्षीदार झाला आहे. यादरम्यान वेगवेगळ्या हिंसक घटनांमध्ये १०१ नागरिक आणि ७७ सुरक्षा कर्मचारी मारले गेले होते. याच ठिकाणी आता ‘पुष्पा २’ अर्थात ‘पुष्पा: द रूल’चं चित्रीकरण होणार आहे.

मायथ्री मूव्ही मेकर्सचे प्रॉडक्शन मॅनेजर पी वेंकटेश्वर राव यांनी ‘पुष्पा २’च्या शूटिंगशी संबंधित अपडेट्सची माहिती दिली. ते म्हणाले की, 'स्वाभिमान आंचलचे क्षेत्र पाहिल्यानंतर आमची प्रॉडक्शन टीम समाधानी आहे. आमच्या या टीममध्ये फाईट मास्टर, असोसिएट डायरेक्टर आणि आर्ट डायरेक्टर यांचा समावेश आहे. हंटलागुडा, सप्तधारा आणि झुलापोला ही ठिकाणे पुष्पा २च्या शूटसाठी तात्पुरती फायनल करण्यात आली आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग करण्यासाठी आम्ही मलकानगिरीचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची परवानगी घेतली आहे. याबाबत आम्ही सीमा सुरक्षा दलाशी देखील चर्चा केली आहे. ते देखील या शूटिंगमध्ये सहकार्य करण्यास तयार आहेत. जर सर्वकाही नियोजनानुसार झाले तर मे महिन्यात शूटिंग सुरू होऊ शकते.’

स्वाभिमान आंचलमध्ये जवळपास १५० ते २०० लोक शूटिंगसाठी उपस्थित राहणार असल्याचे राव यांनी सांगितले. मात्र, अल्लू अर्जुन स्वत: या लोकेशन्सवर शूट करण्यासाठी येणार की, नाही हे अद्याप समजलेले नाही. चित्रपट निर्मात्यांनी शूटिंगसाठी जिल्हा दंडाधिकारी आणि एसपी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. शूटिंगदरम्यान नियमांचे पालन करण्याचे आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

WhatsApp channel

विभाग