Allu Arjun On Pushpa 2 stampede : 'पुष्पा २'चा अभिनेता अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमध्ये घडलेल्या घटनेला अपघात म्हटले आहे. शनिवारी या प्रकरणाबाबत बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, माझ्या चारित्र्याचे हनन केले जात आहे. ४ डिसेंबरच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा पूर्णपणे अपघात आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या मुलाच्या प्रकृतीबाबत मी दर तासाला अपडेट घेत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सगळं चांगलं आहे. खूप चुकीची माहिती दिली जात आहे, खोटे आरोप केले जात आहेत. मला कोणत्याही विभागाला किंवा राजकारण्याला दोष द्यायचा नाही. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.’
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या आरोपांनंतर अल्लू अर्जुनने ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांची परवानगी नसतानाही अल्लू अर्जुन ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’च्या स्क्रीनिंगदरम्यान संध्या थिएटरमध्ये गेला होता. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही अभिनेता चित्रपटगृहाबाहेर आला नाही, त्यानंतर पोलिसांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढले, असा आरोप त्यांनी केला. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. जेव्हा अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरी आणि मृत्यूची माहिती देण्यात आली तेव्हा त्याने सांगितले की, आता हा चित्रपट हिट होईल.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या ८ वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा हवाला देत मुख्यमंत्री रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर आरोप केला की, प्रचंड गर्दी असूनही त्यांनी रोड शो काढला आणि गर्दीला निमंत्रण दिलं. ४ डिसेंबरला अल्लू अर्जुन व इतरांच्या एंट्रीवेळी सुरक्षा देण्याची मागणी नाट्यगृह व्यवस्थापनाने २ डिसेंबर रोजी पोलिसांना पत्र लिहून केली होती. मात्र, गर्दीव्यवस्थापनात अडचणी आणि प्रवेश व बाहेर पडण्यासाठी एकच गेट असल्याचे कारण देत पोलिसांनी अर्ज फेटाळून लावला.
'पुष्पा २ द रुल' देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तसेच जगभरात अनेक विक्रम मोडत आहे. ‘पुष्पा २ द रुल'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने १६ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या