बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या'पुष्पा२' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटाच्यानिर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. रश्मिका मंदानाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज म्हणून चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. नवीन पोस्टरमधला श्रीवल्लीचा नवा अवतार एकदम थक्क करणारा आहे. रश्मिकाचा हा अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच, हे पोस्टर पाहिल्यानंतर ती या चित्रपटात काय धमाल करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
'पुष्पा२' चित्रपटाचे हे नवीन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘श्रीवल्ली... नॅशनल हार्टथ्रोब... वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ या पोस्टरमध्ये रश्मिका मंदाना एकदम नवीन हॉट अवतारात दिसत आहे. तिचा हा अवतारही थोडा भीतीदायक देखील आहे. पोस्टर पाहून तुम्हालाही असं वाटू शकतं.
‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना एका निष्पाप मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण, आता रश्मिकाचा अवतार पुढच्या भागात वेगळा असणार आहे. तिच्या तीक्ष्ण नजरेकडे आणि रागाने भरलेल्या नजरेकडे बघून तिच्या पात्राचा अंदाज येत आहे. ‘पुष्पा २’ एक प्रकारे श्रीवल्लीचा लूक पॉवरफुल असणार आहे.'पुष्पा२' मध्ये आता श्रीवल्ली अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’लाच टक्कर देणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण, या चित्रपटाच्या पोस्टरमधील तिची स्टाईल स्त्रीशक्ती दाखवणारी आहे.
नुकतंच‘पुष्पा २: द रूल’चं आणखी एक पोस्टर रिलीज झालं होतं. या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली होती. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिले होते की, 'चला 'पुष्पा मास जत्रा' सुरू करूया. बहुप्रतिक्षित'पुष्पा २: द रुल'चा टीझर ८ एप्रिल रोजी दुप्पट ताकदीने येत आहे.’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
'पुष्पा२'ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 'पुष्पा२' हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.२०२४च्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर तुम्हाला हा ॲक्शन चित्रपट पाहता येणार आहे. याआधी'पुष्पा२' मधील अल्लू अर्जुनचा लूकही रिलीज झाला आहे. त्या पोस्टरनंतर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके आणखी वाढले आहेत.
संबंधित बातम्या