Allu Arjun Arrested : शेवटी ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Allu Arjun Arrested : शेवटी ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

Allu Arjun Arrested : शेवटी ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

Dec 13, 2024 02:44 PM IST

Allu Arjun Arrested : हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्लू अर्जुन अटक
अल्लू अर्जुन अटक

Allu Arjun Arrested : तेलुगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन याला ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी संध्या थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, चित्रपटाची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना पोलिसांना देण्यात आली नव्हती. या प्रकरणी आता अल्लू अर्जुनला शुक्रवारी चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात अभिनेत्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये बहुचर्चित 'पुष्पा २' चित्रपटाचे स्क्रिनिंग रिलीजच्या एक दिवस आधी पार पडले होते. या स्क्रिनिंगमध्ये अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अचानक चित्रपटगृहात पोहोचला होता. त्याच्या आगमनामुळे तिथे असलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड गदारोळ माजला आणि चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीरपणे जखमी झाला.

थिएटरबाहेर जमलेले चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक होते. त्याच्यासोबत अनेक चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. धक्काबुक्की आणि गदारोळामुळे अनेकजण एकमेकांवर पडले आणि काही लोक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. गर्दी ओसरल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एका ३९ वर्षीय महिलेला मृत घोषित केले, तर तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासोबत थिएटर व्यवस्थापनावरही कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pushpa 2 Collection : ‘पुष्पा २’चं वादळ थांबायचं नाव घेईना! सलग ८व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

पोलिसांनाही दिली नाही कल्पना!

पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, थिएटर व्यवस्थापन किंवा अल्लू अर्जुनच्या टीमकडून त्याच्या आगमनाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या कारणामुळे चाहत्यांमध्ये अशांतता निर्माण झाली. नाट्यगृह व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रणासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना घेतल्या नव्हत्या. याशिवाय, अभिनेत्याच्या टीमसाठी स्वतंत्र प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही.

थिएटर व्यवस्थापनाने अल्लू अर्जुनच्या आगमनाबद्दल आधीच माहिती असतानाही, त्यांनी कोणतीही योग्य तयारी केली नाही, ज्यामुळे गंभीर दुर्घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संध्या थिएटरविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, त्यात अल्लू अर्जुनचेही नाव आरोपी म्हणून देण्यात आले आहे. या घटनेने सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी सुरक्षेची महत्त्वाची बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Whats_app_banner