मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता पुष्कर श्रोत्री याचा आज (३० एप्रिल) वाढदिवस आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री याने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विनोदी भूमिका असो किंवा खलनायक प्रत्येक पात्राला पुष्करने न्याय दिला आहे. अभिनयाच्या आवडीपायी पुष्करने आपली बँकेतील नोकरी देखील सोडली होती. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असतानाच पुष्कर श्रोत्रीला त्याच्या पहिल्या कामाची ऑफर मिळाली होती. बँकेत काम करत असताना पुष्कर वेगवेगळ्या नाटकांमध्ये भूमिका करत होता. २००३पासून तो चित्रपट विश्वामध्ये सक्रिय झाला. ‘हापूस’, ‘कायद्याचे बोला’ यांसारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तर, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात देखील तो झळकला. यानंतर त्याने पूर्णवेळ मनोरंजन विश्वाला देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने त्याची बँकेतील नोकरी देखील सोडली.
पुष्करने मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजबावण्यासाठी नोकरी सोडून दिली होती. मात्र, काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की, तो काही गोष्टी ऑफिसच्या डेस्कवरच विसरून आला होता. आपल्या गोष्टी परत मिळाव्या म्हणून त्याने ऑफिसमध्ये फोन केला. तिकडून एका मुलीने फोन उचलला. या मुलीचं नाव होतं प्रांजल. आपल्या वस्तू परत घेण्यासाठी पुष्कर आणि प्रांजल एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते. त्यावेळी सामान घेण्याच्या निमित्ताने दोघांमध्ये खूप गप्पा देखील रंगल्या.
बराच वेळ निघून गेल्यावर प्रांजल पुष्करला म्हणाली की, मला आता घरी जावं लागेल. कारण, मला बघायला पाहुणे येणार आहेत. तेव्हा पुष्करने तिला विचारलं की, तू इतक्या लवकर लग्न करतेस का? आणि मग बोलता बोलता त्यांचा विषय वाढत गेला. पुष्कर प्रांजलला म्हणाला की, मला एकदा ख्रिश्चन लग्न बघायचे आहे. तर, प्रांजल त्याला म्हणाली की, मलाही महाराष्ट्रीयन लग्न बघायचंय आहे. तर, हजरजबाबी असलेल्या पुष्करने लगेच उत्तर देत म्हटलं की, मग आपणच लग्न करूया का?
अचानक पुष्करचं प्रपोजल ऐकून प्रांजल थोडीशी गोंधळूनच गेली होती. तिच्या मनात विचार आला की, इतका सुंदर मुलगा आणि त्याने अचानक असं लग्नाचा विचारल्यावर उत्तर तरी काय देऊ? मात्र, प्रांजलने थोडासा वेळ घेतला. पण, पुष्करला होकार दिला. तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पुष्कर प्रांजलला पहिल्यांदा एक चित्रपट बघायला घेऊन गेला होता. प्रांजलने होकार दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र बाहेर गेले होते. त्या दिवशी प्रांजलसाठी पुष्करने खास प्लॅनिंग केलं होतं. गंमत म्हणजे पुष्करने आनंदाच्या भरात चित्रपट कोणता आहे, हे देखील पाहिलं नाही. चित्रपट पाहण्यासाठी आत गेले तेव्हा कळले की, हा हॉलिवूड चित्रपट सेवेन होता. हॉलिवुडचा क्राईम थ्रिलर चित्रपट बघण्यात दोघे इतके गुंतून गेले की, त्या दोघांनीही संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत एकमेकांकडे ढुंकूनही बघितलं नाही. दोघांच्या आयुष्यात असे किस्से अनेकदा घडले आहेत.