‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या घरात लोकप्रिय झाले. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. त्याने काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी खरी ओळख त्याला बिग बॉग मराठी या रिअॅलिटी शोने मिळवून दिली आहे. या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. आता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सामाजिक, राजकीय तसंच सिनेसृष्टीतील विविध घडामोडींबद्दलही स्पष्ट बोलताना दिसतो. आता पुष्करची एक वेगळी पोस्ट चर्चेत आहे.
अभिनेता पुष्कर जोगच्या आयुष्यात सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहे. पण ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे हे पुष्करने सांगितलेले नाही.
पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'सगळ्यांसाठी सगळं केलं. खरा वागलो. जेव्हा जेव्हा मानसिकरित्या खचतो तेव्हा आपले कोण कोण हे शोधतो. आई आणि मुलगी. नशिबवान आहेत ते सर्व ज्यांना काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कुणी कुणी यायचं यांची यादी देऊन जाईन मी. उगाच किती वाईट वाटलं याचा आव आणून येऊ नका' असे पुष्कर म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, “अजून १२ वर्षे आहेत. राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार जिंकायचा आहे. आई-बाबांसाठी लीजेंड (Legend) होऊनच जाईन, आई आणि फेलीशा तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले.” सोशल मीडियावर पुष्करची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
पुष्कर जोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार असल्यामुळे सर्वजण प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.