मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे पुष्कर जोग. लवकरच त्याचा 'मुसाफिरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. दरम्यान, पुष्करने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पुष्करने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर संतप्त पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: दुसऱ्या दिवशी 'फायटर'च्या कमाईत वाढ, केली कोट्यवधींची कमाई
यापूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. महापालिकेचे कर्मचारी घरी जातीय सर्वेक्षण करायला आल्याचे सांगितले होते. प्रजासत्ताक दिनी जात विचारली जात असल्याचे केतकी चितळे म्हणाली होती. जाती भेदाचे कायदे केले जात आहेत, असे केतकी म्हणाली. प्रत्येकासाठी आपला कायदा समान आहे की जातीनुसार वेगवेगळे कायदे, नियम बनवले जात आहेत? असा सवालही केतकीने उपस्थित केला होता.