सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचा कंटेन्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मग चित्रपट असो वा सीरिज असो. आजकाल मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होणारा कंटेन्ट हा विशेष करुन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आता एका नाटकावर आधारित वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन 'रानबाजार' या वेब सीरिजच्या दिग्दर्शकाने केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'रानबाजार'च्या जागतिक यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला 'पुरुष' ही नवीन वेब सीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. नुकतेच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली असून या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: 'फॅमिली मॅन ३' सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
'पुरुष' ही वेब सीरिज जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित आहे. समाजरचनेतील पुरुषी अहंकार आणि त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार तसेच वास्तविक जीवनावर भाष्य करणारी ही वेब सीरिज आहे. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत आणि अभिजित पानसे, श्रीरंग गोडबोले, प्रसन्न आजरेकर यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. तसेच या सीरिजमध्ये सचिन खेडेकर आणि मृण्मयी देशपांडे हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. ही सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याविषयी माहिती देण्यात आलेली नाही.
वाचा: कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; "होय महाराजा"चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
अभिजित पानसे घोषणेबाबत म्हणतात, "पुरुष ही वेब सीरिज पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करतात, स्त्रियांना माणूस म्हणून नाही तर लैंगिक वस्तू म्हणून पाहिले जाते याबद्दल स्त्रियांची प्रतिक्रिया या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज पाहण्यासारखी आहे. त्यामुळे ही वेब सीरिज प्रत्येक स्त्री पुरुषाने बघायला हवी."
वाचा: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!