Pulkit Samrat-Kriti Kharbanda Engagement: बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा ही जोडी गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहे. या जोडीचे फोटो नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या जोडीची रोका सेरेमनी नुकतीच पार पडल्याचे म्हटले जात आहे. आता या जोडप्याच्या रोका सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. बॉलिवूडची ही जोडी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले नाव कमावले आहे. दोघेही जवळपास चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता हे जोडपे त्यांच्या नात्याला पुढच्या पायरीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहे. क्रिती आणि पुलकितच्या रोका सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये ही जोडी आपल्या कुटुंबासोबत दिसली आहे.
या फोटोंमध्ये रोका सोहळ्याचा आनंद पुलकित आणि क्रिती या दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे. या फोटोमध्ये पुलकितने क्रितीचा हातात घेऊन सुंदर फोटो पोज दिली आहे. या फोटोसेशन दरम्यान दोघेही आपापल्या अंगठ्या फ्लाँट करताना दिसले आहेत. मात्र, अद्याप दोघांनी अधिकृतपणे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. मात्र, सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. आता चाहते दोघांच्या अधिकृत घोषणेची वाट बघत आहेत.
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी 'वीरे दी वेडिंग' आणि 'पागलपंती'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची प्रेमकहाणी देखील एका चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. क्रिती खरबंदा आधी पुलकितने २०१४मध्ये सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता.
सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. पुलकित सम्राट अखेर ‘फुक्रे ३’मध्ये दिसला होता. या चित्रपटाने १०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. लवकरच पुलकित सम्राट ‘सुस्वागतम् खुशामदीद’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात पुलकितसोबत कतरिनाची बहीण इसाबेल कैफ झळकणार आहे. क्रिती खरबंदाबद्दल बोलायचे झाले तर, ती विक्रांत मेस्सीसोबत ‘१४ फेरे’ या चित्रपटात झळकली होती. त्यांचा हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, यानंतर क्रिती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
संबंधित बातम्या