Bigg Boss Marathi Day 67 : बिग बॉसच्या इतिहासात जे आजतागायत झालं नाही ते या पर्वात झालं असून प्रत्येक सदस्याला त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवण्यात येत आहे. ग्रँड फिनालेआधी होणाऱ्या या ग्रँड सेलिब्रेशनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमधील गोलीगत एन्ट्रीने चाहत्यांचं आणि बिग बॉसप्रेमींचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सूरज चव्हाणने सुरुवातील बिग बॉस मराठीसाठी नकार दिला होता. त्यानंतर टीमने त्याची मनधरणी केली आणि तो तयार झाला.
‘एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड’ केतन माणगांवकर यांनी नुकताच 'नवशक्ती'शी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये त्यांनी बिग बॉससाठी सूरजचे कास्टिंग कसे झाले याविषयी वक्तव्य केले. “फेब्रुवारीपासून आम्ही या सीझनच्या कास्टिंगला सुरुवात केली होती. आम्ही प्रत्येकाला वैयक्तिकरित्या भेटलो. आता सूरजबद्दल सांगायचं झालं, तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा काहीच मार्ग नव्हता. मी त्याचं प्रोफाइल पाहिलं होतं, त्यावर एक नंबर होता तो लागत नव्हता. मग थोडी विचारपूस केल्यावर आम्हाला समजलं की, तो कोणत्या तरी गावात राहतो पण, कुठे राहतो वगैरे काहीच माहिती नव्हतं” असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, “माझ्या टीमला मी काही करून सूरजशी संपर्क साधा असे सांगितले होते. मग, माझी टीम जेजुरीच्या पुढे सूरज एका गावात राहतो तिथे जाऊन पोहोचली. ज्यावेळी त्याची भेट घेतली तेव्हा तो म्हणाला, ‘मला शो माहितीये पण, मला सहभाग घ्यायचा नाहीये. मला गावात राहायचं आहे’ नंतर, मी त्याला व्हिडीओ कॉल करून समजावलं. त्याला अजिबात गर्दी आवडत नाही… त्याला त्याची माणसे आजूबाजूला आवडतात. तो गाव सोडून फारतर १ ते २ वेळा बाहेर गेला होता. त्याला मी बिग बॉसच्या आधीच्या सिझनचे २-३ एपिसोड बघ आणि निर्णय घे असं समजावून सांगितलं.”
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
मोठ्या हॉटेलमध्ये सूरजला एण्ट्री देण्यात येत नव्हती. पण तोंडाचा रुमाल त्याने जेव्हा काढला तेव्हा पूर्ण गर्दी त्याच्या भोवती जमली. “आमचं भेटण्याचं ठरलं आणि त्यानंतर आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये बसलो होतो. तिथे तो आला तेव्हा त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि त्या गार्डने त्याला थांबवलं मग, मी हात दाखवून सांगितलं की, तो मला भेटायला आला आहे. त्यानंतर मग आत येऊन सूरजने तोंडावरचा रुमाल काढला आणि पुढच्या १० सेकंदात त्याच्या अवतीभोवती गर्दी निर्माण झाली होती. त्याच्याबरोबर प्रत्येकाला फोटो काढायचे होते. म्हणजे ज्या माणसाला काही वेळापूर्वी आत सोडत नव्हते, त्याने रुमाल काढल्यावर एवढी गर्दी झाली तेव्हाच मला जाणवलं हा खूप वेगळा आहे पण, तरीही अंतिम निर्णय मी त्याच्यावर सोडला होता” असे केतन म्हणाले.