Priyadarshan On Hera Pheri 3: 'हेरा फेरी' या गाजलेल्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता अखेर चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी यावर मौन सोडले आहे. 'हेरा फेरी ' हा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्याचा जवळपास प्रत्येक सीन आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग कल्ट क्लासिक आहेत. या चित्रपटांवर आजघडीला अनेक मीम देखील बनले आहेत. ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाबद्दल अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. हा चित्रपट बनत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. पण निर्माते आणि कलाकारांनी अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.
आता मीडियाशी झालेल्या संवादादरम्यान, प्रियदर्शनने शेवटी 'हेरा फेरी ३'वर मौन सोडले आहे. यावेळी त्यांनी आशा व्यक्त केली की, लवकरच अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचे पुनर्मिलन पाहायला मिळेल. प्रियदर्शनने आयफा उत्सवम २०२४मध्ये सांगितले की हे संयोजन नेहमीच उत्कृष्ट ठरले आहे. या टीमने जी धमाल केली होती, तीच पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आशा प्रियदर्शन यांनी व्यक्त केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हेरा फेरी' २०००मध्ये रिलीज झाला होता. परंतु सिक्वेलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नीरज व्होरा यांच्याकडे देण्यात आली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘फिर हेरा फेरी’मध्ये तब्बू, बिपाशा बसू, रिमी सेन आणि राजपाल यादव देखील दिसले होते.
‘हेरा फेरी ३’ व्यतिरिक्त, प्रियदर्शन अक्षय कुमार सोबत ‘भूत बांगला’ नावाच्या दुसऱ्या चित्रपटाची तयारी करत आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे, ज्यात अक्षय तीन महिला सह-कलाकारांसह जादूगाराची भूमिका साकारणार आहे. ब्लॅक मॅजिकच्या थीमवर आधारित हा प्रकल्प लवकरच शुटिंग सुरू होणार आहे आणि २०२५मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची अपेक्षा आहे. इंडस्ट्रीतील रि-रिलीज ट्रेंडवर बोलताना प्रियदर्शन यांनी त्यांच्या क्लासिक चित्रपटांची पुनरावृत्ती करण्यात स्वारस्य असल्याचे म्हटले.
अक्षय कसा अभिनेता आहे, याबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्यानंतर अक्षय हा एकमेव अभिनेता आहे, जो दिलेल्या वेळेवर काम करतो. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या भूमिका असलेल्या 'भूल भुलैया'चा पहिला भाग प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. 'भूल भुलैया ३च्या आगामी रिलीजबद्दल बोलताना प्रियदर्शन म्हणाले की, अनीस बज्मीने 'भूल भुलैया'च्या दुसऱ्या भागामध्ये चांगले काम केले आहे आणि आता मनापासून वाटते की तो तिसऱ्या भागामध्येही असाच धमाका करेल.