मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनय व सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिने मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवले. टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रिया सगळ्याच प्रेक्षकांची खूप लाडकी आहे. आज १८ सप्टेंबर रोजी प्रियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
अभिनेत्री प्रिया बापट ही मुळची मुंबईचीच.. प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. प्रियाने सोफिया कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने, प्रियाने मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळवली. यादरम्यान प्रियाने अनेक मराठी नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व्यतिरिक्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे हिंदी चित्रपट तिने गाजवले. याच काळात ती मराठी मराठी मालिकांमध्येही लोकप्रिय झाली होती.
प्रिया बापटने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजचे आता दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.पण जेव्हा सीरिजचा पहिला सिझन आला तेव्हा त्यातील एका सीनची विशेष चर्चा रंगली. अभिनेत्रीने लेसबियन किसिंग सीन दिला होता. सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वी हा सीन तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रियाला तुफान ट्रोल केले जात होते.
‘बोल्ड सीनबाबत मला वाटतं की, ते तुमच्या कथेचा भाग आहेत का? तुम्ही कोणती भूमिका साकारता आहात? दिग्दर्शक कोण? लेखक कोण? ते दृश्य कथेची गरज म्हणून करतायत की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे? तुमच्या त्या दृश्यांनी कथेत खरंच मोठा फरक पडणार आहे का? या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात,’ असे प्रियाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
प्रिया वडिलांनी जेव्हा बोल्ड सीन पाहिला तेव्हा ते बोलले हे सांगताना म्हणाली, “‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रदर्शित झाल्यावर ती क्लिप सगळीकडे व्हायरल होत होती. मला सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती कारण, मी प्रमोशनमध्ये व्यग्र होते. मला ज्या क्षणी ती क्लिप दिसली, तेव्हा मी सगळ्यात आधी बाबांना फोन केला त्यांना सगळी कल्पना दिली. तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत? असेही मी त्यांना विचारले. त्यावर माझ्या बाबांनी एका शब्दात मला उत्तर दिलेले, ते म्हणजे हा सगळा तुझ्या कामाचा एक भाग आहे. तू काम म्हणून हे स्वीकारलेस यात आम्हाला काहीच गैर वाटत नाही. तू दुर्लक्ष कर…विसरुन जा!”
प्रिया आणि उमेशची मैत्री तशी जुनी होती. एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांची अधूनमधून भेट देखील व्हायची. प्रियाला कॉलेजमध्ये असल्यापासूनच उमेश खूप आवडायचा. मनोरंजन विश्वात सक्रिय झाल्यानंतर तिने आपलं करिअर घडवलं आणि उमेशसोबत मैत्रीदेखील केली. हळूहळू हे मैत्री प्रेमात बदलली. अर्थात यासाठी प्रियाने स्वतः पुढाकार घेतला होता. सुरुवातीला दोघांनीही एकमेकांना पुरेसा वेळ दिला. नंतर एक दिवशी प्रियाने स्वतःच उमेशसमोर प्रेमाची कबुली दिली. तर, उमेशने मात्र थोडा वेळ घेत प्रियाच्या वाढदिवशी होकार देत तिला सरप्राईज दिलं.