छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'प्रेमाची गोष्ट' पाहिली जाते. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये स्वत:ची जागा टिकवून ठेवली आहे. सतत मालिकेतील वेगवेगळ्या ट्विस्टमुळे चर्चेत असणारी मालिका सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला. अचानक तेजश्रीने मालिका का सोडली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागचे कारण अद्याप समोर आले नसले तरी मालिकेत आता अभिनेत्री स्वरदा थिगळे मुक्ताची भूमिका साकारणार आहे. पण नेटकऱ्यांना ते खटकटले आहे. त्यांनी स्वरदाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्रीला पाहण्याची प्रेक्षकांना सवय झाली होती. त्यामुळे स्वरदाला आता मुक्ताच्या भूमिकेत पाहताना प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच ‘मराठी सीरियल ऑफिशियल’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर स्वरदा ठिगळेची पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कार सहन करावा लागतो.”
सोशल मीडियावर नेटकऱ्याची कमेंट व्हायरल झाली आहे. या कमेंटला स्वरदाने उत्तर देण्याऐवजी मराठी सीरियल ऑफिशियल या पेजनेच उत्तर दिले आहे. “हे खरं आहे. अगदी खरं आहे. पण ते त्यांचं काम करत आहेत. तुलना होणारच आहे. पण एक उदाहरण, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगली होती. रुपाली सगळ्यांना आवडली. तर बघूयात आता ‘प्रेमाची गोष्ट’चं काय होत आहे?” असे त्यांनी म्हटले.
स्वरदाने देखील चाहतीच्या या प्रश्नाचा स्क्रीनशॉट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने, “आजही कलेचे असे खरेखुरे चाहते आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार” असे म्हटले आहे.
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यानंतर कोणती अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण तेजश्रीने सर्वांच्या मनावर राज्य केले होते. आता स्वरदाला कितपत यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वरगाने आजवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘वेलकम होम’ अशा काही प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
संबंधित बातम्या